मुंबई : फेंगल चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवलाय. पुद्दुचेरीमध्ये मोठा कहर बघायला मिळाला. अनेक विमाने रद्द करण्यात आली आणि शाळांनी सुट्टी जाहीर केली. अनेक रस्ते जलमय झाले. या फेंगल चक्रीवादळाला प्रभाव महाराष्ट्रामध्येही दिसतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. यासोबतच काही जिल्हांमध्ये पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आलीये. अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब आहे. भारतीय हवामान विभागाचे पुण्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X वर याबद्दलची माहिती शेअर केली आहे .
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून या चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली. मागील काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच वाढली होती. सांगली, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धावशिव, वाशिम, हिंगोली, बीड आणि संभाजीनगर या जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखीन तीव्र होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे .
फेंगल चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे. यामुळेच त्याचा परिणाम वातावरणावर झाल्याचे बघायला मिळतंय. हवामान खात्यासह पंजाबराव डख यांनी देखील फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसणार असल्याचे म्हटले. बऱ्याचदा पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल दिलेले अंदाज खरे होताना दिसतात. पंजाबराव डख यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. सहा जिल्ह्यांमध्ये फेंगल चक्रीवादळाचा परिणाम ५ डिसेंबरला अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. गुरुवारी सातारा, पुणे, रत्नागिरी, लातूर, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलाय.