बीड दि. २ (प्रतिनिधी ) : बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांनी हूल दिली होती, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करीत सदर वाहने पकडायला लावली होती आणि सदर वाहने पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आली होती. आता त्यातील एक हायवा गायब झाल्याचे समोर आले आहे . या प्रकरणात संबंधितांवर आज गुन्हे दाखल होतील अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाला वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांनी हूल दिल्याची घटना चार दिवसांपूर्वी पाडळसिंगी जवळ घडली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि इतरांनी सदर वाहने पकडून बीडच्या पोलीस मुख्यालयात लावली होती. मात्र मुख्यालयात लावलेले सदर वाहन गायब झाल्याचे रविवारी समोर आल्याने खळबळ माजली होती. आता या प्रकरणात सदर वाहन मालकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आज (मंगळवारी ) सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे अशी माहिती बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
एका वाहनाशी संबंधित व्यक्तीने घेतली होती जिल्हाधिकाऱ्यांची भेट
दरम्यान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या निर्देशांवरून सदरची कारवाई झाल्यानंतर एका वाहनाशी संबंधित व्यक्तीने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली होती, तसेच त्यांच्यासमोर आपल्या बाजूचे 'गीत ' गेले होते. विशेष म्हणजे त्यावेळी महसुलात 'काळ्या ' धंद्यांसाठी ख्यातनाम असलेल्या एका व्यक्तीची देखील उपस्थिती असल्याचे सांगितले जाते . त्या भेटीचा या प्रकाराशी काही संबंध आहे का याच्या चर्चा आता महसूल वर्तुळात सुरु आहेत.