मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र, त्यातच आता काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. राज्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे.
अकोला
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी. आर हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. या मतदान केंद्रावरील मतदान अद्याप सुरू झाले नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळल उभे आहेत. दरम्यान, अकोल्यात विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली.
मालेगाव
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक २९२ या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे.
जळगाव
जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला १५ ते २० मिनिटे उशीर झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशीन गेल्या एका तासापासून बंद पडले आहे.प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू आहे. नागरिकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. मतदान करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे मतदार वैतागले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदार केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.
बुलढाणा
जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात मतदानयंत्रात बिघाड झाल्याने तेथे काही वेळ मतदान थांबले. खामगाव मतदारसंघात मतदान यंत्रातील बिघाड हा अभिरूप मतदानाच्या वेळीच पुढे आला. त्यानुसार एक सीपीयु आणि तीन व्हिव्हिपँट युनिट बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.