विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. पण असं असतानाच आज विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला. या आरोपानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं.
जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. मात्र, या गोंधळानंतर विनोद तावडे यांनीही हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, यावर विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा हा ‘नोट जिहाद’ आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.