शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे आपली हत्या करण्याचा डाव असल्याचे रमेश कदम म्हणाले आहेत. या प्रकरणी पोलिसांना तीन जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
ऑडिओ आणि व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये मध्ये रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत उल्लेख आहे . पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिल्याच्या कदम यांच्या फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १४०(२), १४०(३), ६२, ३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र, मुख्य आरोपी आबासाहेब काशीदचा शोध सुरु आहे.
रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी आबा काशीद याने सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांनी जीवितला धोका असल्याबाबत दुसऱ्यांदा पोलिसांत तक्रार दिली आहे.मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. पक्षाने एक दिवसातच निर्णय बदलत राजू खरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर रमेश कदम आणि सिद्धी कदम या दोघांनीही अर्ज भरला होता. मात्र नंतर त्यांनी अर्ज मागे घेतला.