महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेतही देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत
मी पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हा माझ्याकडे कोणतेही पद नव्हते. पण दुसऱ्या वर्षी मी राज्यमंत्री ते मुख्यमंत्री झालो. रोहितचे पहिले वर्ष संपले आहे, आता त्याचे दुसरे वर्ष आहे, असं म्हणत शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत देण्यात आले. २० तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.