Advertisement

संघर्ष थांबविण्याचा मुंडे बहीण भावाचा संकल्प 

प्रजापत्र | Tuesday, 12/11/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ११ (प्रतिनिधी ) : 'आपण दोघे एक असलो तर आपल्यासमोर उभे राहायची कोणातच हिम्मत नाही ' याची जाणीव लोकसभेचा निकाल आणि विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही झाली असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच जिथे धनंजय मुंडे 'पंकजांसाठी कोणतीही आहुती देण्याची ' तयारी दाखवीत आहेत तेथे पंकजा मुंडे देखील 'आपल्यातील संघर्ष थांबवित आहोत , आपल्यातील संघर्षामुळे दोघांचेही नुकसान ' झाल्याचे सांगत आहेत .
बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबातील राजकीय वाद बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. २००९ ला परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना पुढे करण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडेंनी घेतला आणि तेथूनच मुंडे कुटुंबात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना भाजपने विधानपरिषदेवर घेतले (त्यासाठी कमी पडणारी मते अजित पवारांनी दिली असे खुद्द धनंजय मुंडे यापूर्वी म्हणाले आहेत ) , मात्र धनंजय मुंडेंची विधानपरिषदेवरील निवड मुंडे कुटुंबातील फूट रोखू शकली नाही. पुढे धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले, गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन झाले , नंतरच्या विधानसभा निवडणुकीत परळीत बहीण भावाची लढाई रंगली, त्यात धनंजय मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला.
मात्र राजकारण इतके साधे सरळ नसते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षाला भाजप आणि राष्ट्रवादी दोघांनीही संधी समजले. इयकडे पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री झाल्या, तर तिकडे धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने विरोधीपक्ष नेता केले. इथपर्यंत कुटुंबातील फुटीनंतरही दोघांचेही तसे काही नुकसान झाले नव्हते , गावपातळीवर कार्यकर्ते भांडत होते , हा भाग वेगळा. मात्र नंतरच्या काळात पंकजा मुंडेंच्या पक्षातिलच विरोधकांनी पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंना बळ दिले, २०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, मागची पाच वर्ष त्यांना राजकीय विजनवासात काढावी लागली , मात्र धनंजय मुंडेंचाही फार काही उत्कर्ष झाला असे नाही. 'पहाटेच्या शपथविधी'मुळे शरद पवारांनी धनंजय मुंडेंना 'समाजकल्याण ' खात्यावर समाधान मानायला भाग पाडले . या साऱ्या काळात पंकजा आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ समोरासमोर येत असल्याचा आनंद अनेकांनी घेतला. हा झाला इतिहास.
आता राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थिती बदलली आहे. बदलत्या परिस्थितीत भाजपला ओबीसी असलेल्या पंकजा मुंडेंची आवश्यकता वाटू लागली. त्यामुळेच लोकसभेत झालेल्या पराभवानंतर भाजपने त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन केले. इकडे लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवाने धनंजय मुंडे यांना देखील जिल्ह्यातील निवडणूक सोपी नसल्याचे संकेत दिले होतेच, त्यामुळे आता 'प्रारब्धाने वेगळे झालो होतो , आता प्रारब्धानेच एकत्र आलोत ' असे धनानंजय मुंडे म्हणत आहेत . त्यांना स्वतःमध्ये 'जत्रेतला चुकलेला मुलगा ' दिसत आहेत तर पंकजा मुंडेंना देखील 'एका दशकानंतर भाऊ आपल्याकडे ओवाळून घ्यायला आलाय ' याचा आनंद असल्याचे दिसतेय . 'आपल्यामध्ये संघर्ष असल्याने अनेकांनी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न केला ' असा सल पंकजा मुंडे बोलून दाखवीत आहेत . आणि आता संघर्ष नको इथपासून अगदी धनंजय मुंडेंनी 'कमळ ' घेतलं असतं तरी हरकत नव्हती इथपर्यंतचा व्यापकपणा पंकजा मुंडे दाखवू लागल्या आहेत. मुंडे बहीण भावामधील हा राजकीय एकोपा खरोखर जिल्ह्याची राजकीय समीकरणे पुन्हा बदलतो का ? हे आता येणारा काळच सांगेल.

Advertisement

Advertisement