राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून संपूर्ण ताकद लावून प्रचार केला जात आहे. यातच, महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ते माध्यमांसोबत बोलत होते.
महाविकास आघाडीच्या किती जागा येतील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह येथे पुन्हा एकदा प्रचार करत आहेत. ते लोकसभेला जेथे जेथे फिरले होते, तेथे पराभव झाला होता, तेच चित्र यावेळीही असेल का? असा प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले, "ते जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील." एवढेच नाही, तर १७० ते १८० च्या दरम्यान आमच्या (महाविकास आघाडी) जागा यायला हरकत नाही," असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.