विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज (सोमवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. यादरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेतली आहे.
आपला अर्ज माघारी घेण्यासाठी स्वतः मधुरिमाराजे छत्रपती, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने काँग्रेसची मोठी गोची झाली असून आता या मतदारसंघात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.