बीड दि. २४ (प्रतिनिधी ) १९९० ला ज्यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली, त्यावेळी जिल्ह्यातील ७ पैकी ४ जागा लढवून शिवसेना मोठा भाऊ बनला होता , मात्र नंतरच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे राजकीय प्रस्थ वाढत गेले आणि त्यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या सेनेकडून एकेक मतदारसंघ काढून घ्यायला सुरुवात केली, ती इतकी की बीड जिल्ह्यात केवळ बीड हा एकच मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे राहिला होता. अशा पद्धतीने जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यात आले, मात्र आता महायुतीच्या राजकारणाचा महिमा म्हणून असेल पण खुद्द गोपीनाथ मुंडेंच्या परळीत कमळ असणार नाही. जिल्ह्यात भाजपला जास्तीत जास्त २ मतदारसंघांवर समाधान मानावे लागेल अशी परिस्थिती आहे. याला राजकीय शोकांतिका म्हणायचे का नेतृत्वाचे अपयश ?
बीड जिल्हा हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा. पाणी या जिल्ह्यात मोठ्या मेहनतीने म्हणण्यापेक्षाही युक्तीने भाजप वाढविला. इतर पक्षातील मातब्बरांना पक्षात घेऊन, त्यांना उमेद्वाऱ्या देऊन त्यांनी अनेकांना आमदार केले आणि जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची संख्या देखील वाढविली.
१९९० ला राज्यात पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची युती झाली. ९० ची विधानसभा या दोन पक्षांनी युती म्हणून लढविलेली पहिली निवडणूक. त्यावेळी गोपीनाथ मुंडे काही विरोधीपक्ष नेते झालेले नव्हते , मात्र पक्षात त्यांच्या नावाचा दबदबा होता . त्याकाळात बीड जिल्ह्यात सेनेची संघटनात्मक शक्ती जास्त होती. म्हणून मग युतीमध्ये सेनेने ४ तर भाजपने ३ जागा लढविल्या. बीड जिल्ह्यात एकेकाळी सेनेने ४ जागा लढविल्या असतील यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही, पण ९० मध्ये माजलगाव , गेवराई, बीड, आष्टी या ४ ठिकाणी सेना लढली . पुढे ९५ च्या निवडणुकीवेळी राज्यात गोपीनाथ मुंडेंचा करिष्मा वाढला होता . ते विरोधीपक्ष नेते झालेले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती, त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातही त्यांचे राजकीय वजन वाढले होते . त्या निवडणुकीत त्यांनी सेनेकडचा माजलगाव मतदारसंघ भाजपला घेतला आणि सेनेला ३ तर भाजपला ४ जागा मिळाल्या.
९९ ची निवडणूक आणखीच वेगळी होती.गोपीनाथ मुंडेंची उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द राज्याने पहिली होती, गोपीनाथ मुंडेंचे जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण होत होते, त्यामुळे त्या निवडणुकीत सुरेश धस यांच्यासाठी म्हणून भाजपने आष्टीची जागा घेतली . सेनेच्या वाट्याला केवळ गेवराई आणि बीड राहिले. पुढे २००४ च्या निवडणुकीत अमरसिंह पंडितांसाठी म्हणून भाजपने म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी गेवराई देखील भाजपकडे घेतले. सेनेला उरला एकमेव बीड मतदारसंघ . अन मग एकेकाळी ४ विधानसभा लढविणारी सेना जिल्ह्यात केवळ एका मतदारसंघात मायदेत झाली. अशा पद्धतीने बीड जिल्हा भाजपचा म्हणा किंवा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला झाला.
२००४ ते २०१९ अशा ४ निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला ५ मतदारसंघ असायचे. आता मात्र महायुतीच्या राजकारणात भाजपचे बळ जिल्ह्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.महायुतीमध्ये ज्याचा विद्यमान आमदार , त्याची जागा असे सूत्र लावण्यात आले , २०१९ ला बीड जिल्ह्यात भाजपच्या केवळ २ जागा होत्या (केज, गेवराई ), आता त्यातही गेवराई मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्या जाण्याच्या शक्यता अधिक आहेत, भाजपला आष्टी हवा आहे, पण त्यावरचा दावा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. इतकेच काय खुद्द गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जेथून प्रतिनिधित्व केले त्या परळीची जागा देखील राष्ट्रवादीला गेली, म्हणजे येथे देखील मतदानयंत्रावर कमळ दिसणार नाही. एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधिक जागा लढविणार भाजप गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यातच १ किंवा फारतर २ जागा इतका आक्रसला जावा हे अपयश नेमके कोणाचे?