Advertisement

दर्शन करून परतताना अपघातात दोघांचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 07/10/2024
बातमी शेअर करा

सोलापूर : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावी परत जाताना तरुण भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले. सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्यवळणावर पहाटे हा अपघात झाला. यातील मृत व जखमी सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत.

 

सुखदेव बामणे (वय ४०) आणि नैनेश कोरे (वय ३१, दोघे रा. नांदणी, जि. कोल्हापूर) अशी दोघा मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये सुरज विभूते (रा. कुठली, जि. कोल्हापूर), शिवानंद कोरे (वय ३५, रा. वडगाव, जि. कोल्हापूर) आणि सुधीर चौगुले (वय ३५, रा. नांदणी) यांचा समावेश आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जोराच्या अपघातात सुखदेव बामणे आणि नैनेश कोरे हे दोघे मृत मोटारीतून बाहेर फेकले गेले. रस्त्यावर हाडा मासांचा सडा पडला होता. हे सर्वजण नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रविवारी रात्री कोल्हापूरहून तुळजापुरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन कोल्हापूरकडे परत जात असताना त्यांची भरधाव मोटार (एमएच ०९ एफबी ३९०८) पाठीमागून २६ चाकी मालमोटारीवर (एम पी २० झेडएम ९५१८) जोरात आदळली. ही मालमत्ता सांगोल्यातून डाळिंब भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती कळताच सांगोला पोलिसांनी चिंचोली बाह्य वळणावर अपघातस्थळी धाव घेतली.

Advertisement

Advertisement