अमित शहांनी नागपूरच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांना १०℅ मते वाढविण्याचा सल्ला दिला. भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदारांच्या संख्येवर आजघडीला मर्यादा आल्या आहेत. जे पारंपरिक मतदार आहेत आणि मतदानासाठी बाहेर पडत नाहीत त्यांनाच यंदा समजूत काढून बाहेर काढण्याचे काम भाजपला करावे लागेल. याशिवाय ज्यांच्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली ते अजित पवार काय निर्णय घेतात ते देखील पाहावे लागेल. कारण महायुतीत राहून अजित पवारांना सहानुभूतीपेक्षा अधिक नाराजी भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्या अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले आणि त्यांनी तिसरी आघाडी करून स्वतंत्र निवडणूक लढविली तर याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो. आणि जे १० टक्के मतांचे समीकरण मांडले गेले आहे ते याच पद्धतीने सोडविले जाऊ शकते याची त्यांना काही प्रमाणात कल्पना आहे.
भाजपमध्ये मागच्या १५ वर्षांपासून अमित शहा निवडणूक मॅनेजमेंटचे गुरु मानले जातात. बूथ लेव्हलपासून ते मतदारांचे नियोजन करीत त्याचे मतांमध्ये परिवर्तन करण्याचे कौशल्य त्यांचेकडे आहे. आता विधानसभेत महायुतीला याच कौशल्याचा पुन्हा एकदा वापर करून महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना शहांनी ‘लवकरच होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयासाठी १० टक्के मते अधिक हवी आहेत. ती मते मिळवण्याचा प्रयत्न आगामी कालावधीमध्ये करावा,’ असा संदेश दिला.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.येत्या ८ ते १० दिवसांत आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी आप-आपल्या पक्षाची रणनीती आखताना दिसतात. नागपूरमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शह यांनी फक्त ‘दहा टक्के मते’ असा शब्दप्रयोग केला असला तरी लोकशाही राजकारणातील निवडणुकीचा विचार करता १० टक्के या मतदानाच्या आकड्याच्या मागे फक्त हे विशेषण लावून चालत नाही. कारण १० टक्के मते लाखोंच्या घरात असतात. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मोठ्या प्रमाणावर दमछाक होणार यात तिळमात्र शंका नाही.आतापर्यंत झालेल्या निवडणुकांचा विचार करता २ ते ३ टक्के मतांचा जरी आमूलाग्र बदल झाला तरी सत्तेचे समीकरण बदलतात हे वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दहा टक्के अधिक मते मिळवण्याचा संदेश दिला. त्यासाठी त्या प्रमाणातच परिश्रम देखील घ्यावे लागणार आहेत. ‘लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या, तरी काळजी करण्याचे कारण नाही. राज्यातही आपले सरकार येईल’, अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांना देताना अमित शहा यांनी ‘महायुतीतील प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करा’ हा संदेश दिला हे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच काँग्रेसला पराभूत करणे हेच लक्ष्य ठेवताना दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही रोखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे भाजपाचा बालेकिल्ला असलेला विदर्भ राखण्याचे काम भाजपाला करावेच लागणार आहे. विदर्भात किमान ६२ पैकी ४५ जागा जर भाजपने जिंकल्या तर राज्यात सत्तेवर येणे सोपे जाईल, असेही त्यांनी सुचित केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मराठवाड्यात भाजपला फारसे यश मिळेल असे चित्र नाही. कारण मराठा आरक्षण, मुस्लिमांचे होत असलेले सातत्याने खच्चीकरण, दलितांच्या मतांमध्ये निर्माण झालेले परिस्थिती भाजपच काय महायुतीच्या अडचणीत वाढ घालणारी आहे. त्यामुळे महायुतीला विदर्भात जरी आशादायक चित्र असले तरी कमी अधिक प्रमाणात अशीच काहीशी परिस्थिती तिकडेही निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदारांच्या संख्येवर आजघडीला मर्यादा आल्या आहेत. जे पारंपरिक मतदार आहेत आणि मतदानासाठी बाहेर पडत नाहीत त्यांनाच यंदा समजूत काढून बाहेर काढण्याचे काम भाजपला करावे लागेल. याशिवाय ज्यांच्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली ते अजित पवार काय निर्णय घेतात ते देखील पाहावे लागेल. कारण महायुतीत राहून अजित पवारांना सहानुभूतीपेक्षा अधिक नाराजी भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्या अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले आणि त्यांनी तिसरी आघाडी करून स्वतंत्र निवडणुका लढविल्या तर याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो. आणि जे १० टक्के मतांचे समीकरण मांडले गेले आहे ते याच पद्धतीने सोडविले जाऊ शकते याची त्यांना काही प्रमाणात कल्पना आहे. कारण हे काम म्हणावे इतके सोपे नाही, याची जाणीव महायुतीतील सर्वच घटक पक्षांना आज आहे. महायुतीची आज सर्वात जमेची बाजू म्हणजे सध्या सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळे मतदारांना आकर्षित करणारे विविध प्रकारचे निर्णय ते घेत आहेत. तसेच येणाऱ्या काळात अजून काही निर्णय देखील सरकार म्हणून ते घेऊ शकतात. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मतांचा पाया करण्याचा त्यातील एक प्रयत्न होता, असे अनेक प्रयत्न झालेच तर अमित शहा यांना अपेक्षित असलेली मतांमधील वाढ होईल. पण त्याचे प्रमाण १० टक्क्यांवर जाईलच हे आज सांगणे कठीण आहे.