बीड दि. २८(प्रतिनिधी ) : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ज्या बीड जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविले होते, त्या बीड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अर्थात या वर्चस्वाचे नेतेपण आहे ते धनंजय मुंडेंकडे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जिल्ह्यातल्या फारशा जागा येणार नाहीत असे सांगितले जात असतानाच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अचानक बीड जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघाच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे जिल्ह्यात भाजपची रणनीती काय असणार याच्या चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत.
बीड जिल्हा हा तसा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत चित्र बदलले. स्वतः पंकजा मुंडेंचा परळीत पराभव झाला. त्यासोबतच आष्टी, माजलगाव या जागा देखील भाजपने गमाविल्या. बीडची जागा तर तशी भाजपची कधीच नव्हती. फक्त गेवराई आणि केजमध्ये कमळ फुलले. आता २०२४ ची परिस्थिती वेगळी. ज्यांच्यामुळे जिल्ह्यात कमळ कोमेजले होते, त्यांनीच लोकसभा निवडणुकीत कमळासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पण पंकजा मुंडेंचा पराभव झाला. तो सल प्रत्येकाला वेगळा आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे विधानपरिषदेवर आहेत. त्यांच्याकडे पक्षाने पुणे जिल्ह्यासह आणखी काही भागांची जबादारी दिली आहे. त्यांचे तिकडे दौरे देखील झाले. त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. पण पंकजांच्या स्वतःच्या जिल्ह्याचे काय? इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता काय राष्ट्रवादीच्या ओंजळीने पाणी प्यायचे काय? भाजपच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न छळत होता आणि अजूनही आहे देखील. पण बोलायचे कोठे? पण आता कार्यकर्त्यांची तीच कोंडी फोडण्यासाठी पंकजा मुंडे जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी परळीत बैठका देखील घेतल्या. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील कार्यकर्ते या बैठकांना हजेरी लावीत होते आणि आम्ही कोणाच्या दाराला जायचे असे विचारीत होते. आता महायुतीच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे तरी उघडपणे काय बोलणार? युतीधर्म पाळायलाच सांगणार ना, पण या बैठकांमधून युतीधर्मासोबतच त्यांनी अनेक ठिकाणच्या करत्याधर्त्यांना 'आश्वस्त' केले आहे म्हणतात. आता या आश्वसतेचा आणि पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातील राजकीय सक्रियतेचा अर्थ कोणी काय घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न .