बंगळूर : बंगळूरमधील वैय्यालीकावल येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणातील (Bengaluru Mahalakshmi murder) संशयित मुक्ती रंजन रॉय (Mukti Ranjan Roy) याने ओडिशामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले आहे. गेल्या २१ सप्टेंबर रोजी महालक्ष्मी हत्या प्रकरण उघडकीस आले होते. यामागे मुक्ती रंजनचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक ओडिशातील भद्रा जिल्ह्यातील पंडी येथे गेले होते. त्याआधीच संशयिताने जीवन संपवल्याचे उघडकीस आले.
महालक्ष्मीची (Mahalakshmi murder) निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामुळे बंगळूर शहरात खळबळ उडाली होती. २९ वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह २१ सप्टेंबर रोजी तिच्या राहत्या घरी फ्रिजमध्ये आढळून आला होता. तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करण्यात आले होते. महालक्ष्मीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत फ्रिजमध्ये सापडला होता. आता या हत्या प्रकरणातील संशयित मुक्त रंजन रॉय याचा ओडिशात मृतावस्थेत आढळून आला आहे. तो बंगळूरमधून पसार झाल्याच्या काही आठवड्यांनंतर त्याचा शोध लागला आहे.
मंगळवारी रात्री मुक्ती रंजन घरातून आपल्या दुचाकीवरून बाहेर गेला होता. नजीकच्या निर्जन ठिकाणी त्याने झाडाला गळफास घेतला. पंडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भद्रक रुग्णालयाकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली, लिहिले खुनाचे कारण?
मुक्ती रंजनच्या मृतदेहाजवळ अधिकाऱ्यांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने महालक्ष्मीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांबाबत लिहिले आहे. तसेच चिठ्ठीत मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी यांच्यात वैय्यालीकावल येथील घरी झालेल्या जोरदार भांडणाचा उल्लेख केला आहे. रंजनने रागाच्या भरात महालक्ष्मीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला. या चिठ्ठीत त्याने दोघांमधील प्रेमसंबंधाचा खुलासा केला आहे.
घटनास्थळी काय सापडले?
ओडिशातील भद्रक जिल्ह्यात रंजनचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या माहितीनुसार, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी दुशुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्याची बॅग, लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह अनेक वैयक्तिक वस्तू जप्त केल्या आहेत.
महालक्ष्मी बंगळूरमधील एका मॉलमध्ये काम करत होती. तिथे रंजन मॅनेजर म्हणून काम करत होता. तिच्या कॉल रेकॉर्डवरून रंजनशी तिचे वारंवार बोलणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे रंजनकडे संशयाईची सुई वळली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रंजन बेपत्ता होता आणि त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला होता.