Advertisement

  गर्भपात करून मुलीला पुरले

प्रजापत्र | Tuesday, 24/09/2024
बातमी शेअर करा

इंदापूर: गर्भलिंगचिकित्सेनंतर (Abortion)  खाजगी डॉक्टरकरवी गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून टाकले. या प्रकरणात अतिरक्तस्त्रावामुळे २३ वर्षांच्या विवाहितेचा (death) मृत्यु झाला. वडापूरी ( ता.इंदापूर) येथे दि.२२ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेस कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन त्या विवाहितेचा पती,सासू व सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पती व सास-याला अटक करण्यात आले आहे. सासु फरार आहे.

 

राहुल भिमराव धोत्रे (वय २८ वर्षे),लक्ष्मी भिमराव धोत्रे, भिमराव उत्तम धोत्रे (वय ५० वर्षे तिघे रा. वडापूरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ऋतुजा राहुल धोत्रे (वय २३ वर्षे,रा.वडापूरी) असे मयत झालेल्या दुर्देवी विवाहितेचे नाव आहे.या प्रकरणी तिचा भाऊ विशाल शंकर पवार (वय २५ वर्षे,रा.पिंपरद,ता.फलटण जि.सातारा) याने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी सांगितले की,सन २०१७ मध्ये ऋतुजाचा राहुलबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर साधारण एक वर्षभर तिच्या सासरचे लोक तिला व्यवस्थित नांदवत होते. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. त्या वेळेपासून मुलगा पाहिजे या कारणावरुन तिचा सासरा भिमराव धोत्रे, सासु लक्ष्मी धोत्रे व पती राहुल धोत्रे यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. सन २०२१ मध्ये तिला मुलगा झाला. मात्र त्यानंतर ही लहान गोष्टीवरून ऋतुजाचा सासरी छळ होत होता. याची माहिती ती वेळोवेळी माहेरी देत होती. सन २०२२ मध्ये यासंदर्भात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल होती. त्यावेळी तक्रार मागे घ्यायला सांगून ऋतुजाच्या पतीने तिला नांदवण्यासाठी आणले होते. मात्र त्रास बंद झाला नव्हता.

रविवारी (दि.२२) रोजी राहुल धोत्रे याने ऋतुजाच्या चुलता दादा पवार यास फोन करुन ती आजारी आहे, तिला बघून जा असा निरोप दिला. त्यामुळे चुलता व चुलती ऋतुजाच्या घरी आले होते. चुलतीला तेथेच ठेवून चुलता रात्री उशीरा त्यांच्या घरी पोहोचला. सोमवारी सकाळी दहा वाजता फिर्यादी विशाल यास राहुलचा फोन आला. ऋतुजाला दवाखान्यात घेवून आलो आहे. तुम्ही कधी येताय असे त्याने सांगितले. फिर्यादीने काय झाले अशी विचारणा केली असता काही न सांगता राहुलने फोन कट केला. फिर्यादी व त्याचे नातलग इंदापूरला यायला निघाल्यानंतर त्याला त्याच्या चुलत्याचा फोन आला. ऋतुजा ही चार महिन्याची गर्भवती होती. राहुल धोत्रे व इतर आरोपींनी गर्भ तपासुन घेतला. मुलीचा गर्भ असल्याचे समजल्यावर त्यांनी इंदापूर येथील एक खासगी डॉक्टरला बोलावून त्याचे राहते घरी गर्भपात करण्याची गोळ्या औषधे दिली. त्यामुळे ऋतुजा हीचा गर्भपात (Abortion) झाला. लहान चार महिन्याचे स्त्रीजातीचे अर्भक राहुल धोत्रे याने जमिनीत पुरले आहे. त्यानंतर सुध्दा ऋतुजा हीस रक्तस्त्राव होत असल्याने खाजगी डॉक्टरला घरी बोलावून ऋतुजावर उपचार केले, मात्र त्यांचा (death) मृत्यु झाला. अशी माहिती चुलत्याने फिर्यादीस दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकूळ पुढील तपास करत आहेत. 

 

 

त्यानंतर हे सर्वजण अर्ध्या वाटेत असताना राहुलल फोन वरुन फिर्यादीच्या चुलतीने ऋतुजाचा मृत्यु झाल्याचे सांगितले, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गर्भलिंग चिकित्सा करण्यास कायद्याने बंदी असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोपी कोठून गर्भलिंग चिकित्सा करुन घेतली. इंदापूरच्या कोणत्या खासगी डॉक्टरने ऋतुजाचा गर्भपात केला या बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement