Advertisement

 मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार

प्रजापत्र | Tuesday, 24/09/2024
बातमी शेअर करा

 मालवण- सिंधुदुर्ग येथील (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan) राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेत्यांनी मालवण येथे जाऊन भेटी दिल्या. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली. आता महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुतळा पडल्याप्रकरणी चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी ठोस पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे. 

 

 

काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा दिमाखदारपणे उभा राहावा, यासाठी सरकारने  नव्या पुतळ्यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. इच्छूक शिल्पकारांना ३ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल. त्यानंतर ४ ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, शिवाजी महाराजांचा किल्ल्यावरील पुतळा कोसळला, यासाठी वाऱ्याचा प्रचंड वेग कारणीभूत असल्याचा दावा महायुती सरकारच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता नवा पुतळा उभारताना या गोष्टींची काळजी कशी घेतली जाणार, नवा पुतळा किती उंचीचा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगितले जात आहे.
 

Advertisement

Advertisement