Advertisement

एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय,दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल : संजय राऊत

प्रजापत्र | Tuesday, 24/09/2024
बातमी शेअर करा

नाशिक : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यु झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता संजय राऊत यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.  

 

 

संजय राऊत म्हणाले की, शंका घ्यावी असेच हे प्रकरण आहे. मुंबई किंवा देशभरातील कुठलंही एन्काऊंटर हे कधीही खरे नसते. त्यात काहीतरी रहस्य असतं. काहीतरी संपवायचं असतं. या प्रकरणात जेव्हा ही घटना घडली त्यावेळी बदलापुरातील जनता आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत रस्त्यावर उतरली होती. त्यांनी रेल्वे बंद पाडली,  रस्ते ब्लॉक केले, मंत्र्यांना परत पाठवले होते. संपूर्ण राज्यात तणावाची परिस्थिती होती. आम्हाला आरोपी हातात द्या, आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा शिक्षा देऊ, अशी लोकांची मागणी होती. तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितले की, असे करता येणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. आम्ही फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवू. या सगळ्या आंदोलकांवर त्यांनी कायदा हातात घेतलं म्हणून दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या अशी त्यांची मागणी होती. 

 

 

 

एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल
 
राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला? आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते, म्हणून त्याचं एन्काऊंटर झालं. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल. सरन्यायाधीशांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचायसोबत चहा घेतला. मग कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या? अजित पवार यांच्या बाबत जी सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्यविनोद करतात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असेही संजय राऊत म्हणाले. 

Advertisement

Advertisement