मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
२९ सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या २९ सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या २९ सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे
दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.