Advertisement

अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?

प्रजापत्र | Thursday, 19/09/2024
बातमी शेअर करा

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अजित पवार यांचा फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो करण्यात आल्याने पक्षाने याबाबत संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्युज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे. 

गेल्या दीड महिन्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच 'लाडकी बहीण योजने'सह महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जनसन्मान यात्रेला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही जणांना पोटशुळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजितदादा पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजबाबत घडला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून ते समाज माध्यमांमधून फिरवण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.

 

 

नेमकं काय आहे प्रकरण?
अजित पवार यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अडल्ट कंटेंट असलेल्या पगलेट क्वीन नावाच्या फेसबूक पेजला काल रात्री फॉलो केले जात आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरून  4 जणांना फॉलो केले जात होते.रात्री आणखी एका अकाऊंटला फॉलो  करण्यात आलं. यामध्ये पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नावाचा समावेश होता. पण या चौघा अकाऊंटसोबत पगलेट क्वीन अकाऊंटला फॉलो करण्यात आले आहे. 

 

 

फॉलो केलेल्या पेजवरील कंटेट अडल्ट
या पेजवर कंटेट अडल्ट कंटेंट शेअर केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या हातून असा प्रकार झाला की अकाऊंट हॅक झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

 

 

काही दिवसांपुर्वी खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल फोन हॅक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोन काही दिवसांपुर्वी हॅक झाला होता. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या कायमच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं. त्यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर आपला फोन हॅक झाल्याची माहिती दिली होती.

 

Advertisement

Advertisement