विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने वादंग निर्माण झाले. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांकडून महायुतीला लक्ष्य केले जात आहे. गायकवाडांच्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घेरले.
"राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार", असे विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्याबद्दल नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, "शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे."