बीड दि.१३(प्रतिनिधी): बीडचे पोलीस अधिक्षक म्हणून अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर अवैध धंदेवाल्यांना दणका देण्याचे काम हाती घेतले आहे. शुक्रवारी शहरातील तब्बल १९ बिअरशॉपीवाल्यांवर अविनाश बारगळ यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ज्या शॉपींवर दारु अथवा बिअर विक्री करणे केवळ बंधनकारक असतांना १९ बिअरशॉपी चालक नियमांचे उल्लंघन करून त्याच ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी परवानगी देत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अविनाश बारगळ यांनी प्रजापत्रला दिलेल्या माहितीनुसार शहरात १९ बिअरशॉपी नियमांचे उल्लंघन करून चालत होत्या. या बिअरशॉपींना केवळ मद्यविक्रीची परवानगी आहे. मात्र ते त्याच ठिकाणी मद्य प्राशन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करत होते. त्यामुळे शहरातील १९ बिअरशॉपींवर एकाचवेळी आम्ही कारवाया केल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर बीड पोलीस याच पद्धतीने कठोर कारवाया करणार असल्याचे बारगळ यांनी म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात बीड शहर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण, पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत किती लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याची माहिती उद्या सकाळीच कळणार असल्याचे एसपींनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा