Advertisement

कोचिंगक्लासचा प्रवेश रद्दनंतर फीसवरुन वाद

प्रजापत्र | Friday, 13/09/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : ट्यूशनचा प्रवेश रद्द केल्यानंतर भरलेले शुल्क परत करण्याच्या मागणीतून संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ट्यूशनमध्ये प्रवेश करून तोडफोड केली. गुरुवारी दुपारी २ वाजता आकाशवाणी येथील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली.

 

 

इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक विश्वंभर कुलकर्णी यांनी याप्रकरणी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीतील आरोपानुसार, माजलगावच्या एका विद्यार्थ्याने १४ एप्रिल रोजी अकरावी, जेईई कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्यावेळी आगाऊ रक्कम म्हणून ५८ हजार रुपये शुल्क भरले होते. कालांतराने विद्यार्थ्याची इच्छा नसल्याने कोर्स रद्द करून कुटुंबाने भरलेले शुल्क परत मागितले. इन्स्टिट्यूटने नियमानुसार केवळ १५ हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत इन्स्टिट्यूटला संपूर्ण शुल्क परत करण्याची मागणी केली. त्यानंतर इन्स्टिट्यूटने त्यासाठी तयारी दाखविली.

 

 

ब्रँच संचालक आस्वार यांनी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या खात्यावर पैसे पाठविले; परंतु चुकीच्या खाते क्रमांकामुळे आरटीजीएस बाऊन्स झाले. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२० वाजता पुन्हा त्यांनी विद्यार्थ्याच्या मामाच्या बँक खात्यावर २९ हजार ८०७ रुपये पाठवून उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कबूल केले. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्याने गावाकडे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे संघटनेचे रमेश गायकवाड, सचिन मिसाळ, अशोक मोरे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, बाळासाहेब भगनुरे यांनी इन्स्टिट्यूटमध्ये जात राडा घालून तोडफोड केली. रात्री जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement