Advertisement

आरसा विधानसभेचा / निलंगा
 निलंगा दि. १२ (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात लातूर विधानसभेनंतर सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा होय. याही मतदारसंघात १९९५चा अपवाद वगळता निलंगेकरांचे वर्चस्व राहिले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर करीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून काँगे्रसला मताधिक्य असल्यामुळे आ. संभाजी पाटील निलंगेकर अडचणीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र वास्तविक विरोधकांकडे त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा अभाव असल्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा निलंगेकरांचाच बोलबाला राहणार असे चित्र आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदासह विविध खात्यांच्या जबाबदारी सांभाळणारे स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ म्हणून निलंगा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर या मतदारसंघात निलंगा तालुक्यासह देवणी व शिरुर अनंतपाळ या तालुक्यातील गावांचा समावेश झाला आहे. देवणी, शिरुर अनंतपाळ तालुका हा पुर्वीपासूनच भाजपाच्या मागे असल्याचे पाहण्यास मिळालेले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आ. निलंगेकर सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. मतदारसंघाशी त्यांचा चांगला संपर्क असून विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यातच गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करून आ. निलंगेकरांनी मतदारसंघासह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची होणारी अडचण दूर केल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघात सध्यातरी त्यांची चांगली छबी निर्माण झालेली आहे.
लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला पाहण्यास मिळत आहे. परिणामी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी अनेक इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मागील दोन निवडणुकीमध्ये पराभूत झालेले अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह डॉ. अरविंद भातांब्रे,अभय साळुंके आदींचा समावेश आहे.वास्तविक यापूर्वी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह डॉ. अरविंद भातांब्रे यांचाही पराभव केला आहे. त्यामुळे आता विरोधक कोणता नवीन चेहरा रिंगणात उतरवणार याबाबतही अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. मागील १५दिवसांत आ. निलंगेकरांनी मतदारसंघात जनसन्मान यात्रा काढत शंभर गावांतील दीड लाखांपेक्षा अधिक मतदारांच्या भेटी-गाठी घेत आपल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे अशोक पाटील निलंगेकर, डॉ. अरविंद भातांब्रे व अभय साळुंके यांनीही आपला जनसंपर्क सुरू केलेलाआहे. मात्र, आ. निलंगेकर यांना तगडी टक्कर देणारा सक्षम उमेदवार सध्यातरी विरोधकांकडे नाही. त्यामुळे निलंगा मतदारसंघात पुन्हा एकदा निलंगेकरांचा बोलबाला राहील, असे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Advertisement

Advertisement