आरसा विधानसभेचा /उमरगा-लोहारा
खाजा मुजावर
उमरगा दि. १२ : कुठलीही निवडणूक असो त्या निवडणुकीच्या प्रचाराची भिस्त युवक कार्यकर्त्यावरच असते. आपल्या पक्षाची ध्येय धोरणे, विचारसरणी आपल्या नेत्याची कामे घरोघरी पोहोचविण्याचे काम हे युवक करीत असतात. फक्त प्रचार यंत्रणांची जबाबदारी नव्हे तर शेवटच्या दिवशीही दिवसभर प्रत्येक मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान बूथ पर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक पक्षाचा युवक कार्यकर्ता करीत असतो पण निकाल लागला की त्या युवक कार्यकर्त्याचा कडीपत्ता होवून जातो. नेत्याला त्याचा विसर पडतो, परत पुढच्या निवडणुकीलाच त्याची आठवण येत असते. परंतु आता येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील अशाच काही युवक शिलेदारावर संपूर्ण यंत्रणेची भिस्त राहणार आहे. युवक कार्यकर्त्यांची मोठी फळी असणारे काही शिलेदार
आश्र्लेश मोरे, उमरगा -अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. मितभाषी युवा नेतृत्व असेल तरी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील भाजप मध्ये गेल्यानंतर युवक असून सुद्धा काँग्रेसची संपूर्ण धुरा ते सांभाळत आहेत, जुने नवीन सर्व कार्यकर्त्यांची सांगड घालत पूर्ण वेळ सक्रिय झाले आहेत. भारत शिक्षण संस्थेची मोठी ताकद मतदारसंघात असल्याने महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका यांची राहणार आहे.
किरण गायकवाड, उमरगा - लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडु भेटलेले मराठवाडा युवा सेनेचे निरीक्षक आहेत. सर्व जाती धर्मातील युवकांना सोबत घेऊन राजकीय आणि सामाजिक कार्यात पूर्णवेळ सक्रिय असतात. एक सक्षम युवकांची फळी तयार करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. किरण गायकवाड आणि त्यांच्या युवक फळीवरच महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी असणार आहे.
ॲड आकांक्षा चौगुले उमरगा- ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने उमरगा शहरात एक सुसज्ज अशी अभ्यासिका चालविली जाते. स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली सोय झाल्याने अलीकडच्या काळात तालुक्यातील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत निवड झालेली दिसून येतात. दरवर्षी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दर वर्षी पुरस्कार सोहळे, गौरी गणपती स्पर्धांच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकांच्या मनात जागा निर्माण करण्यात आकांशा चौगुले यशस्वी झालेल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच होणार आहे.
शरण पाटील, मुरूम- वडील बसवराज पाटील व काका बापूराव पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत युवकांची फळी निर्माण करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शरण पाटील. साखर कारखाना, शैक्षणिक संस्था ची एक मोठी ताकद मतदारसंघात आहे. हे सुध्दा येत्या निवडणुकीत सक्रिय असणार आहेत.
बाबा जाफरी,दाळींब - हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते असून प्रसिद्ध समाजसेवक आहेत. समाजातील गरजू गोर गरीब मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजन गृह चालविणे, विद्यार्थ्यांना मदत करणे अशा अनेक घटकांना मदत करण्याचे कार्य बाबा जाफरी यांच्या हातून होत आहे. कोविड काळातील त्यांचे काम वाखण्याजोगे होते, कोविड सेंटर चालविणे ते सर्व धर्मातील कोविड मृतांची अंत्यविधी करण्याचे मोठे काम बाबा जाफरी यांनी केले असल्याने मतदार संघात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे.
हर्ष चालुक्य, मुळज- अनेक पिढ्यंपासून राजकीय वारसा असणारे पण पक्षाच्या पदापासून दूर राहणारे युवक नेतृत्व आहे. नेहमी आक्रमक भूमिकेत असणारे चालुक्य यांची स्वतः ची आक्रमक युवकांची , मित्रांची मोठी फळी आहे. प्रत्येक निवडणुकीत मात्र स्वतः पूर्ण टीम घेवून आक्रमक पणे सक्रिय असतात. शिक्षण संस्था व कै शिवाजी चालुक्य यांना मानणारा मोठा वर्ग यांच्या पाठीशी असल्याने यांची भूमिका पण प्रत्येक निवडणुकीत महत्वाची असते.
ॲड दिपक जवळगे,धानुरी - खासदार ओम राजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय लोहरा तालुक्यातील हसमुख युवा नेतृत्व म्हणजे दिपक जवलगे. जिवलग मित्रमंडळ, विश्वासू युवक कार्यकर्ते सोबत घेवून पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या कामाची छाप निर्माण केली आहे. लोहारा तालुक्यात यांच्यावर प्रेम करणारी युवकांची फळी कार्यरत आहे.
आयुब शेख, लोहारा- राष्ट्रवादी काँग्रेस चा सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रभारी नगराध्यक्ष असा प्रवास गाठणारे आयुब शेख यांची लोहारा व परिसरात चांगली जम आहे. रात्री बे रात्री लोकांच्या अडचणीला वेळ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मानणारा मोठा गट असल्याने यांची भूमिका पण महत्वाची असणार आहे.
संजय पवार, उमरगा- सर्व सामान्य कार्यकर्ता ते दोन वेळा नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत संजय पवार. सर्वसामान्यांची कामे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले संजय पवार राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर शरद पवार गटात राहून तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी उभी करण्याचे काम करीत आहेत,सध्या तालुक्यात पक्षाची धुरा तेच सांभाळतात, महविकास आघाडीत यांची ही भूमिका महत्वाची राहणार आहे.
सुनील साळुंखे, सालेगाव - हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे तालुकाध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या तालमीत तयार झालेले सुनील साळुंखे यानी पण लोहारा तालुक्यात एक स्वतः चे वलय निर्माण केले आहे,तालुक्यात त्यांची पण एक मोठी फळी सक्रिय आहे
दिग्विजय शिंदे, उमरगा - माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद धाराशिव तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार)दिग्विजय शिंदे हे एक सर्व समावेशक युवक नेतृत्व आहे.भाजपाचे नेते कैलास शिंदेचे ते सुपुत्र आहेत.त्यामुळे घरातच दिग्विजय यांना राजकारणाचे धडे मिळाले आहेत. सध्या इच्छुक उमेदवाराच्या यादीत यांचे नाव आहे.
विजय वाघमारे, उमरगा: आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे हे सर्व सामान्य कार्यकर्ता ते विधानसभेचे इच्छुक उमेदवार पर्यंत चां प्रवास त्यांनी कामाच्या जोरावर गाठला आहे. पक्ष फुटिनंतर सुद्धा ते आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. नो चालेंज ग्रुप च्या माध्यमातून तालुक्यात सर्वात मोठी भिम जयंती ते अनेक वर्षापासून काढतात. एक मोठी युवकांची फळी नेहमीच त्यांच्या सान्निध्यात असते.

बातमी शेअर करा