बीड दि. १२ (प्रतिनिधी ) : काही वर्षांपूर्वी भाजपची उमेदवारी म्हणजे जणू विजयाची गुरुकिल्ली मानली जायची, मात्र आता मराठवाड्यात त्याच भाजपच्या उमेद्वारीपासून ४ हात लांब राहता येईल का ? भाजपवरच्या रागाचा फटका बसण्यापेक्षा महायुतीची उमेदवारी न घेता अपक्ष लढत येईल का ? या पर्यायांचा विचार करण्याचा आग्रह सध्या अनेक ठिकाणी कार्यकर्ते भाजप आणि महायुतीमधील आपल्या नेत्यांना करीत आहेत. त्यामुळे या नेत्यांची मात्र झोप उडत असल्याचे चित्र आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल केव्हाही वाजेल असे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका लांबणीवर टाकण्यात 'महाशक्ती ' ला कितीकाळ यश मिळते ते काळ ठरवेल. मात्र सध्याचा काळ , किमान मराठवाड्यात तरी भाजपसाठी 'लाभाचा ' नाही हे नक्की. एकतर महायुतीमधला अजित पवारांचा प्रवेश मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला अस्वस्थ करून गेलेला, त्यातच आता भाजपबद्दल एकूणच वाढत असलेली नाराजी,मराठवाड्यात प्रभावी असलेला जरांगे फॅक्टर आणि या फॅक्टरच्या टार्गेटवर असलेला भाजप,कितीही योजना आणल्या तरी सरकारबद्दल सामान्यांना प्रेम निर्माण होत नसल्याचे चित्र आणि अशा अनेक कारणांनी सध्या भाजपसाठी दिवस अडचणीचे आहेत. त्यामुळेच किमान मराठवाड्यात तरी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते देखील अस्वस्थ आहेत. अनेक मतदारसंघांमध्येभाजपचे कार्यकर्ते सध्या आपल्या नेत्यांना 'यंदा कमळ हाती घेणे जरा अडचणीचेच आहे ' असे सांगताना दिसत आहेत. एकतर मराठवाड्याच्या अनेक भागात आज जे लोक भाजपमध्ये आहेत, ते काही फार जन्मापासून भाजपेयी आहेत असेही नाही. सत्तेसाठीची 'त्या वेळेची ' गरज म्हणून अनेकजण भाजपवासी झालेले . त्यांच्या मूळ मतदार तसा धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्यांक म्हणावा असाच . त्यामुळे त्या मतदारांना आजच्या भाजपचा आक्रमकपणा पचायला तयार नसल्याचे चित्र. त्यातच भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांची खप्पामर्जी झालेली आणि मराठवाड्यात तर मराठा आरक्षण आंदोलनाची धग काहीशी अधिकच. मग अशावेळी थेट कमळ हाती घेणे किंवा कमळाची साथ घेणे म्हणजे 'आगीतून फुफाट्यात ' जलयुगासारखे आहे असेच सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे. बरे जे काही सर्व्हे, अगदी महायुतीमधील पक्षांचेही , समोर येत आहेत ते देखील कार्यकर्त्यांच्या अशा वाटण्यालाच बळ देणारे ठरताहेत . त्यामुळे आता भाजपचे आणि अगदी महायुतीमधील काही पक्षांचेही इच्छुक भाजपपासून दूर राहण्यासाठी वेळ पडली तर अपक्ष लढत येईल का याचा विचार करताना दिसत आहेत. आता बीड जिल्ह्यातच गेवराईच्या आमदारांनी म्हणे कार्यालयाच्या रंगरंगोटीसाठी का होईना पण कार्यालयातून कमळ, भज नेत्यांचे फोटो आणि असे बरेच काही हटविले आहेच, तिकडे माजलगावात हाबाडा देण्यासाठी रमेशराव म्हणे कधी गुलाबी होण्याच्या प्रयत्नात आहेत तर कधी त्यांना तुतारी देखील खुणावीत आहे. आष्टीकरांबद्दल तर नेहमीच ते यांना भेटले, त्यांना भेटले अशा चर्चा सुरु असतातच . मराठवाड्यात भाजपसाठी हे चित्र विचार करायला लावणारे आहे.
प्रजापत्र | Friday, 13/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा