बीड दि. १२ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यावर ज्या क्षीरसागर कुटुंबाने अनेक वर्ष अनभिषिक्त सत्ता गाजविली, त्या क्षीरसागर कुटुंबाला मागच्या काही वर्षात बीड विधानसभा मतदारसंघापुरते अडकून राहावे लागले होते. आता बीड विधानसभेतूनही क्षीरसागर मुक्तीच्या घोषणा त्यांचे परंपरागत विरोधक देतंय आहेत . मात्र त्याचवेळी प्रत्येक क्षीरसागर विरोधकाला क्षीरसागरांची धास्तीही देखील आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात क्षीरसागर कुटुंबाची बैठक झाली आणि दुरावलेले नातेगोते पुन्हा जवळ येणार अशा चर्चा सध्या बीड मतदारसंघात सुरु आहेत. क्षीरसागर कुटुंबाच्या विरोधकांना सध्या 'खरंच , 'ती ' बैठक झाली का हो ? ' हा प्रश्न छळत असल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यावर एकेकाळी दिवंगत खासदार केशरबाई क्षीरसागर यांनी एकहाती वर्चस्व गाजविले. येथील भल्या भल्या पुढाऱ्यांना आव्हान देत केशरबाई क्षीरसागर यांचे राजकारण बहरले. तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न जयदत्त क्षीरसागर यांनी केला. मात्र त्यांना त्यावेळी पक्षातून तितकीशी साथ मिळाली नाही. पक्षातील अजित पवारांसारख्या काही नेत्यांनीच जयदत्त क्षीरसागर यांना बीड विधानसभा मतदारसंघाच्या 'मर्यादेत ' ठेवण्याच्या खेळीला सातत्याने बळ दिले. असे असले तरी बीडमध्ये देखील क्षीरसागरांच्या सर्वच परंपरागत आणि नव्या जुन्या विरोधकांना क्षीरसागर कुटुंबद्दल नेहमीच असूया आणि राजकीय असुरक्षा देखील वाटत आली आहे. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात, त्याप्रत्येकवेळी क्षीरसागर विरोधकांकडून 'क्षीरसागर मुक्तीची ' घोषणा दिली जाते. कधी सुरेश नवले, कधी दिवंगत विनायक मेटे , कधी आणखी कोणी अशा घोषणा अनेकदा दिलेल्या आहेत. मात्र क्षीरसागर कुटुंबाच्या राजकारणाला छेद देणे त्यांच्या विरोधकांना जमलेले नाही.
हा झाला इतिहास , मात्र मागच्या पचवर्षापूर्वी थेट क्षीरसागर कुटुंबातच फूट पडली . जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे चुलते पुतणे एकमेकांसमोर उभे राहिले आणि यात जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यानंतर वर्षभरापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांचे आणखी एक पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर काकांपासून वेगळे झाले . आता विधानसभेसाठी तिन्ही क्षीरसागरांनी कंबर कसलेली आहे. तीन क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात असतील तर क्षीरसागरांचे राजकारण सहज संपविता येईल अशी आशा त्यामुळेच क्षीरसागर विरोधकांच्या मनात पल्लवित झालेली. त्यातूनच अनेकांच्या अनेक गाठी भेटी देखील झालेल्या आणि क्षीरसागर मुक्तीसाठी एकत्र येण्याच्या आणाभाका देखील अनेकांनी खाल्लेल्या . मात्र आता त्या साऱ्याच क्षीरसागर विरोधकांना सध्या एकाच प्रश्नाने छळले आहे.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत म्हणे क्षीरसागर कुटुंबातील सर्वांचीच पुण्यात भेट झाली आणि बैठकही झाली. काका पुतणे सर्वानीच म्हणे 'क्षीरसागरत्व ' जपण्याचे ठरवले आणि आता त्यानुसार म्हणे काही रणनीती आखली जाणार आहे. आता या आजतरी केवळ गप्पच आहेत. अशी काही बैठक झाल्याचे ना क्षीरसागरांपैकी कोणी मान्य करतेय, ना नकार देतेय . पण क्षीरसागरांच्या विरोधकांना मात्र 'खरंच 'ती ' बैठक झाली का हो ? ' आणि झाली असेलच तर क्षीरसागरांचा नेमका 'फार्म्युला ' काय ठरलाय हा प्रश्न छळायला लागलाय . याला धास्ती म्हणायचं नाही तर काय ?