Advertisement

 झेड प्लस सुरक्षा घेतो, पण 'या' अटी पूर्ण करा

प्रजापत्र | Thursday, 12/09/2024
बातमी शेअर करा

 राज्यातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर नवा वाद उभा राहिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही सुरक्षा दिल्याने माझी हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली होती. तसेच ही केंद्रीय सुरक्षा शरद पवार यांनी नाकारल्याचेही सांगण्यात येत होते. अशातच या प्रकरणी आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून अतिरिक्त सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्र सरकारसमोर काही अटी ठेवल्या असून त्या मान्य झाल्यानंतरच ही सुरक्षा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

शरद पवारांचे केंद्र सरकारला पत्र..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय सुरक्षेसंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांनी ही सुरक्षा घेण्याआधी केंद्र सरकारपुढे काही अटी ठेवल्या आहेत. नुकतीच शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांच्याकडून काही अटींचे पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे, त्या मान्य झाल्यानंतरच सुरक्षा घेण्यात येईल, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

 

 

काय आहेत अटी?
१. केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार..

२. कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार

३. स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार

यासह आणखी काही अटी शर्थीचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील तीन प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि शरद पवार यांच्या नावाचा यामध्ये समावेश होता. शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. विधानसभेच्या तयारीसाठी शरद पवार महाराष्ट्रात फिरणार आहेत, त्याचदृष्टीने ही सुरक्षा दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शरद पवारांनी यावरुन शंका उपस्थित करत सुरक्षा नाकारली होती.

Advertisement

Advertisement