शहाजी कोकाटे
भुम दि. ११:महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या अगोदर पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, यांची व कार्यकर्त्यांचा कस लागणारी निवडणूक ठरणार आहे . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परंडा-भूम- वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून आपापल्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या नेत्याची, पक्षाची कामे नागरिकांसमोर ठेवून मतदार आपल्या बाजूने कसा राहील याचा जोर लावत असल्याचे मतदारसंघांमध्ये चित्र आहे.
मागील महिनाभरापासून परांडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, नेते व कार्यकर्त्यांनी एक प्रकारे प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. महायुती शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दौऱ्याच्या माध्यमातून गाव भेटीमध्ये नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यावर भर देणे सुरू केले आहे.गावात केलेली कामे गाव, वाडीवस्तीवर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून मतदारासमोर मांडण्यास मागील महिनाभरापासून सुरुवात केली आहे. उजनी सीनाकोळेगाव बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळणारे हक्काच्या पाण्यासाठीचे उर्वरित काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास देत आहेत. तसेच आपल्या कार्यकाळात मतदारसंघांमध्ये जास्तीतजास्त विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याचा लेखाजोखा सांगितले जात आहे. डॉ तानाजी सावंत व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने स्वखर्चातून अनेक गावांमध्ये शेत रस्त्याची कामे हाती घेतली आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनीही आपल्या कार्यकाळात काय कामे केली हे कार्यकर्त्या समवेत प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर जाऊन सांगण्याचा सपाटाच लावला आहे.मागील दोन महिन्यापासून राहुल मोटे व कार्यकर्ते गाव भेटी घेऊन आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाची उजळणी वाचून दाखवत आहेत. मतदार शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनीही गाव वाडी वस्तीवर भेटी सुरू केल्या असून परंडा भूम वाशी मतदार संघामध्ये तानाजी सावंत, राहूल मोटे, ज्ञानेश्वर पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री तानाजी सावंत, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, यांनी विधानसभा निवडणुकीसाठी समोरासमोर उभे राहण्याची जोरात तयारी सुरू केली असली तरी मतदार कोणाला झुकते माफ देणार हे निवडणूक निकालाच्या दिवशीच समजेल.
---
या निवडणुकीत कार्यकर्त्यांची ताकत समजणार
महायुती व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या सूचनानुसार गाव भेटीला जाऊन मतदारांच्या संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीत स्थानिक नेत्याबरोबर
गावागावातील कार्यकर्त्यांनाही तितकेच महत्त्व असून त्यांच्यावर मतदार किती विश्वास ठेवतात हे देखील येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच.
--