Advertisement

बारामतीत चक्क अजितदादांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

बारामती : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी (दि.१०) मंगळवारी केला.

 

 

अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावलेले होते, त्याला भेट देण्यासाठी यावे असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांनी केला होता. अजित पवार या कार्यक्रमासाठी आले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या जेवरे यांनी भिगवण चौकात   उभारलेल्या बॅनरवरील अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड टाकून तो दिसू नये, असा प्रयत्न केला.

पोलिसांनी तेथे धाव घेत सुरेंद्र जेवरे यांना चौकातून पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण पोलिस ठाण्यात येतो असे जेवरे यांनी सांगितल्यानंतर ते स्वत:च पोलिस ठाण्यात गेले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेनंतर तातडीने संबंधित बॅनर हटविले गेले.

 

 

दुसरीकडे शारदा प्रांगणाच्या दारात लावलेले सुरेंद्र जेवरे यांचे बॅनरवरील फोटो काही जणांनी फाडण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. या प्रकारानंतर भिगवण चौक परिसरात गर्दी जमली होती, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकातच अजित पवार यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत या घटनेचा निषेध केला.

सुरेंद्र जेवरे यांनी यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बारामतीत गणेश महोत्सवाचे शारदा प्रांगणात आयोजन केलेले आहे. अजित पवार यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनास यावे, अशी विनंती जेवरे यांनी केली होती. पवार न आल्याने नाराज झालेल्या जेवरे यांनी अजित पवार यांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला.
 

Advertisement

Advertisement