Advertisement

पंकजा मुंडेंना पक्षाने दिली 'हि' जबाबदारी 

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १० (प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यूहरचना आखण्यास वेग दिला असून पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यात पक्षाच्या वतीने सामाजिक संपर्काची जबादारी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या आ. पंकजा मुंडेंकडे देण्यात आली आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता संघटनात्मक बांधणी आणि विधानसभेसाठी मतदारांना थेट भिडण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी एक समन्वय समिती बनविण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद रावसाहेब दानवेंकडे देण्यात आले आहे. तर वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात आ. पंकजा मुंडेंकडे सामाजिक संपर्काची जबादारी देण्यात आली आहे.

 

आ. पंकजा मुंडे या भाजपमधील प्रभावी अशा ओबीसी नेत्या आहेत. वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि मामा दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडून पंकजा मुंडे यांनी सोशल इंजिअरिंगचे धडे गिरविले आहेत. एका प्रभावी व्होटबँकेवर  त्यांचा पगडा असला तरी ओबीसींच्या विविध समूहांसोबतच इतर समाजघटकांमध्येही पंकजा  मुंडेंचा चांगला वर आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपला सामान्यांचा चेहरा देण्यात यश मिळविले होते. तोच कित्ता पुढे जिरविण्याचे राजकारण पंकजा मुंडे सुरुवातीपासून करीत आल्या होत्या. अगदी गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर लगेच त्यांनी जी संघर्ष यात्रा काढली होती, त्याला देखील राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. पक्षातील विविध जाती समूहांमधील नवे जुने नेते, कार्यकर्ते यांच्यासोबतच पंकजा मुंडे विविध समाजघटकांशी चांगला राजकीय सामाजिक सेतू बांधू शकतात. याच विश्वासातून पक्षाने त्यांच्याकडे सामाजिक संपर्काची जबादारी दिलेली असावी.

Advertisement

Advertisement