Advertisement

 मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार!

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

जालना: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता. 

मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात २८८ उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. 

Advertisement

Advertisement