आष्टी : आष्टी विधानसभा मतदारसंघ हा तसा नेहमीच चर्चेत असणारा . महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाकडे असणार यावरूनच रस्सीखेच असतानाच महाविकास आघाडीने देखील या मतदारसंघात शक्ती लावलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात राम खाडे यांनी संपर्क वाढविला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाच्या उमेदवारासाठी राम खाडे सक्रिय होते, आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांचा मतदारसंघाचा १ संपर्क दौरा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच राम खाडे यांनी मतदारसंघात ओळख निर्माण केली.नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले . राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मागच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आजबे यांच्यासाठी सक्रिय काम करण्याचा त्यांचा स्वतःचा अनुभव असल्याने त्यांना मतदारसंघाची चांगली ओळख आहे. आष्टी मतदारसंघातील अनेक विषयांवर त्यांनी आतापर्यंत आंदोलने केली आहेत .
त्यातही इनामी किंवा देवस्थान जमिनीची प्रकरणे असतील किंवा नरेगा सारख्या योजनांमधील गैरप्रकार , मतदारसंघातील इतर काही विषय, त्यांनी स्वतःची 'प्रस्थापित विरोधा 'ची प्रतिमा निर्माण केलेली आहे. एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा तर तो शेवटपर्यंत , त्यासाठी मग प्रसंगी कोणतीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवायची , हीच मागच्या पाच वर्षातील राम खाडे यांची ओळख झालेली आहे. जिल्ह्यातील अनेक विषय त्यांनी प्रसंगी संकटांना सामोरे जात धसास लावण्याचा प्रयत्न केला. यासाठीच त्यांना आता अगदी पोलीस संरक्षणात फिरायची वेळ आलेली आहे.
हे सारे करतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निष्ठा ठेवून त्यांनी सध्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. नेहमीच्या प्रस्थापित चेहऱ्यांपेक्षा वेगळा आणि सामान्य कुटुंबातला चेहरा असल्याने पक्ष आपला विचार करेल असा विश्वास राम खाडे यांना आहे. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यासाठी आष्टी तालुका पालथा घातला होता. आता विधानसभेच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मतदारसंघात दौरा सुरु केला आहे. त्यांचा पहिला टप्पा जवळपास संपत असून त्यांना मतदारसंघात प्रतिसाद देखील मिळत आहे. आता या प्रतिसादाच्या विचार शरद पवारांची राष्ट्रवादी किती करणार यावर पुढची गणिते अवलंबून असतील.
बातमी शेअर करा