अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या गटातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आत्राम यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुलीला नदीत फेकेन. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असे म्हटले आहे.
यावरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. माझ्याकडे ती गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझे घर फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप आत्राम यांनी शरद पवारांवर केला.
विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम केले जात आहे. जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमची कशी होणार, असा सवाल करत माझ्याकडे दुधारी तलवार असून माझ्या वाटेला गेला तर ती म्यानातून बाहेर काढेन, असे वक्तव्य आत्राम यांनी केला आहे. याचबरोबर आमचे घराणे हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मुलीचे सासरचे आडनाव घेऊन आत्राम यांनी धमकी दिली आहे.
एकप्रकारे आत्राम यांनी त्यांची मुलगी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे कबुल केले आहे. जे माझ्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवतील त्यांना मी बाजुला करणार. या भूमीवरील गरीब, श्रीमंत सर्वांना न्याय मी दिला आहे. गेली ५० वर्षे मी काम करत आहे. आता हे मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार, असा इशारा आत्राम यांनी दिला आहे.