बीड: भैय्या म्हणजे कार्यकर्त्यांची जान, काम कोणतही असो, कार्यक्रम कोणताही असो, कार्यकर्त्याने फक्त आवाज द्यायचा, भैय्या हजर. त्यामुळे ते कायम कार्यकर्त्याच्या गराड्यात रमलेले, कार्यकर्ते तर सोडा, अगदी लहान सहान लेकरांनाही भैय्याच काय आकर्षण असायचं. पण तेच भैय्या सध्या गाडीतपण एकटेच असतात. पुर्वी छोटया मोठया गोष्टीत भैय्या स्वतः थेट प्रतिसाद द्यायचे, आता मात्र कोणीही फोन केला तर ' पी. ए. ला बोला' असंच उत्तर मिळतं. आता पी. ए. ला बोलून कुठं भागत असतं का? पण कार्यकर्ते दुरावलेल्या भैय्याला हे सांगायचं कोणी?
राजकारणात लोकसंग्रह फार महत्वाचा, कायम लोकात रहायच, दिवंगत केशरकाकुंनी दिलेली शिकवण त्यापेक्षा चार पावलं पुढं जाऊन उचलली ती त्यांच्या कुटुंबातल्या भैय्याने. कार्यकर्ता म्हणजे जणू 'भैय्याची जान'. एखादी गोष्ट कार्यकर्त्याने सांगायची, भैय्याने त्याला प्रतिसाद दिलाच म्हणून समजा. त्यामुळेच भैय्याच्या भोवती कार्यकर्त्यांच मोहोळ जमलं, कार्यकर्ते भैय्यासाठी अगदी वेडे म्हणतात तसे झाले. भैय्यासाठी 'काहीही' करायला तयार, कोणी भैय्या हातावर गोंदले तर कोणी छातीवर. बरं भैय्यानी देखील तितकंच प्रेम केलेलं, कार्यकर्त्याचा वाढदिवस तर सोडा, त्याच्या लेकराच्या बारशालाही भैय्या हजर, कोणती मिरवणूक, कोणता उरूस, खांद्यावर झेंडा नाचवत भैय्या गर्दीचा भाग व्हायला तयार. मग कार्यकर्ते वेडे होणार नाहीत तर काय? याच वेडयांनी मग राजकारणातली पहाडासारखी उंची असलेल्या अण्णांना भैय्यासाठी आव्हान दिलं अन जिवाच रान करुन भैय्यांना आमदार केलं.
पण आता जे भैय्या दिसतात ते भैय्या वेगळेचयत. ज्या कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केलं होतं, ते एक एक करुन दुरावले. कोणत्याही कामासाठी भैय्याला फोन केला तर 'पी ए ला बोला' हे उत्तर ऐकाव तरी कोणी कोणी... , पीएला बोलायलाही हरकत नाही, पण बोलायचे नेमकं कोणत्या पीएला हा पुन्हा प्रश्नच, त्यात पुन्हा पीए लोकांच्या स्वतःच्या अडचणी वेगळ्या, त्यांना देखील सर्वाधिकार नाहीत आणि हे कुठे सांगण्याची सोया देखील नाही, मग कार्यकर्त्यांची कामे व्हायची कशी ? बरं , ज्यांनी जीवावर उदार होऊन भैय्यासाठी काम केलं, त्यांनीही आता पी ए सोबतच बोलायच तर मग भैय्यासाठी जीव उधळायचं कारणंच काय होतं? बरं पुर्वी एखादा कार्यकर्ता चार दिवस दिसला नाही तर भैय्याचा जीव म्हणे खालीवर व्हायचा, भैय्या त्याला भेटायला पार घरापर्यंत जायचे, पण आता हा गेला... जाऊदे, तो गेला... काही फरक पडत नाही... असं करता करता कितीतरी कार्यकर्ते दुरावलेत... शहरातले काय, ग्रामीण भागातले काय, पाच वर्षापुर्वी जीव ओवाळून टाकणारे आता कुठयतं याचा शोध घ्यावा असं भैय्याला कधी वाटेल का नाही माहित नाही, पण पुर्वी भैय्याची वाट पाहण्यासाठी उभी असलेली गर्दी, त्यांच्या मागेपुढे असणारा कार्यकर्त्यांचा ताफा पहायची सवय असलेल्यांना एकटया गाडीतले एकटे, फार तर 'भाई' सोबत असलेले कार्यकर्ता दुरावलेले भैय्या पाहताना कसं तरीच वाटतय हे नक्की.