हुंकार बनसोडे
धाराशिव दि. ५ : लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे,राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यानंतर राज्यात जे चित्र पाहायला मिळाले तेच चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळाले पक्ष फोडाफोडी सर्वसामान्य जनतेला आवडली नसल्याचे आणि लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांचा मुद्दा दुय्यम राहिल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसलं धाराशिवमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला असला तरी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीत उत्साह आहे उमेदवारांची भाऊगर्दीही वाढली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही कामाला लागली आहे तर मनोज जरांगे पाटील यांनीही जिल्ह्यात विविध जाती समूहाचा सर्वे करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेऊन ठेवले आहेत.
जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी एक उमरगा लोहारा मतदारसंघ राखीव आहे.धाराशिव-कळंब वगळता बाकी तिन्ही ठिकाणी सत्ताधारी आमदार आहेत भूम परंडा वाशी मतदारसंघाचे नेतृत्व पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ प्रा तानाजी सावंत हे करत आहेत. तुळजापूर-धाराशिव मतदारसंघाचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील,उमरगा लोहारा या राखीव मतदारसंघाचे ज्ञानराज चौघुले हे नेतृत्व करत आहेत तर धाराशिव कळंब मतदारसंघाचे उबठाचे आमदार कैलास पाटील नेतृत्व करत आहेत.जिल्ह्यात सत्ताधारी आमदारांचे वर्चस्व असले तरी लोकसभेत चारही विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे तीन सत्ताधारी आमदार असले तरी त्यांच्यात सर्वच काही आलबेल आहे असे नाही.
भूम परंडा वाशी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ प्रा तानाजी सावंत हे नेहमी आपल्या वादग्रस्त वकव्याने चर्चेत असतात शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना एकेरी भाषा वापरतानाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता तसेच नुकतच सावंत यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडिला मांडी लावून बसल्यावर ओकारी येते असे वक्तव्य करून महायुतीत मिठाचा खडा टाकला आहे त्यावर धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून कसलीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी विधानसभा निवडणुकीत डॉ सावंतांना मदत करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मधल्याकाळात तालुक्याच्या विकासावरून माजी आमदार राहुल मोटे आणि डॉ तानाजी सावंत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती मतदारसंघाचा विकास मीच केला म्हणत सावंत यांनी राहुल मोटे यांच नाव न घेता सत्ता होती त्यावेळी "झक मारली" का ? असा सवाल केला याला प्रतिक्रिया देताना राहुल मोटे यांनी आपल्या काळात कोणकोणती काम झाली याचा लेखाजोखा पत्रकारांपुढे मांडून सात वर्षात तू काय "झक मारली" असा प्रति टोला डॉ सावंतांना दिला होता
तुळजापुरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी एमआयडीसी, तुळजापूर- सोलापूर रेल्वे, तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातुन तीर्थक्षेत्र तुळजापूरात विविध सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू केलं आहे परंतु तुळजापूर विकास आराखड्याला घेऊन स्थानिक व्यावसायिक नागरिक नाराज असल्याचे चित्र आहे विश्वासात न घेता हा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे नागरिक बोलत आहेत तसेच तुळजापूर सोलापूर रेल्वेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे.तर काळा दिवस म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबत केलेले वक्तव्य आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना या निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते. महायुतीकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी संख्या वाढत आहे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर चव्हाण यांचा मुलगा भाजपात गेल्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात, महाविकास आघाडीकडून मधुकर चव्हाण पुन्हा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे मात्र लोकसभेला चव्हाण यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपाला मदत करण्याचे आदेश दिले असल्याचे मतदारसंघात चर्चा आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे धीरज पाटील यांच्यासह आठ-दहाजन इच्छुक आहेत.
उमरगा लोहारा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो हा मतदारसंघ एससीसाठी राखीव आहे सलग चार वेळा ज्ञानराज चौघुले हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत परंतु पक्ष फुटी नंतर चौघुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने त्यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. लोकसभेच्या निवडणूक प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि आमदार ज्ञानराज चौघुले यांना उद्देशून सापांना दूध पाजले असल्याचे वक्तव्य केले होते त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झाले होते की या मतदारसंघातील मतदार शिवसैनिक हा उबाठा सोबतच आहे त्यामुळे आमदार चौघुले यांना ही निवडणूक सोपी असणार नाही.या विधानसभा मतदारसंघातुन लोकसभेला मोठं मताधिक्य खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाले होते.लोकांतील रोष कमी व्हावा म्हणून आमदार चौघुले यांनी मतदारसंघात विकास कामांच्या उदघाटनाचा सपाटा लावला असल्याचे बोलले जात आहे.महायुतीकडून पुन्हा आमदार ज्ञानराज चौघुले यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून प्रा.संजय कांबळे तुंगावकर,रमाकांत गायकवाड, अशोक सरवदे, सातलींग स्वामी यांच्यासह अनेक उमेदवार इच्छुक आहेत वंचितही उमेदवारांची चाचपणी करत आहेत,तर मनोज जरांगे पाटील यांनीही इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले आहेत.
धाराशिव कळंब मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार कैलास पाटील आहेत यांनी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर कुठल्याही अमिशला बळी न पडता उद्धव ठाकरे यांची साथ दिली त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकात आमदार कैलास पाटील यांच्या बाबत आदर बाळगला जात आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी कस फसवलं हे सांगून पीक विमा मिळवा यासाठी ऐन दिवाळीत आमरण उपोषण केलं सरकारच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आमदार पाटील यांनी सातत्याने पीक विमा,अतिवृष्टीतील नुकसान भरपाई, सोयाबीनच्या भावासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहेत.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ते विधानसभेत प्रश्न मांडताना दिसले याच अनुषंगाने विधानसभेला टाळे ठोकण्याचे आंदोलन केले होते. यावेळीही त्यांनाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे महायुतीकडून पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार आहेत.
खरं तर या वेळच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात आणि वंचित बहुजन आघाडी कशी निवडणुकीचे गणित मांडते यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे निवडणुकीचे काय निकाल लागतील हे निवडनुकीनंतरच पहावे लागेल.
बातमी शेअर करा