बीड दि. ३ (प्रतिनिधी ): बीड जिल्ह्याच्या सहा मतदारसंघांपैकी महत्वाचा असणारा मतदारसंघ म्हणून बीडची ओळख. क्षीरसागर कुटुंबाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिलेला आणि ऍन्यूकडं क्षीरसागरांना धक्का देणाराही , असा हा मतदारसंघ . यावेळी मात्र प्राथच या मतदारसंघाचे चित्र सर्वाधिक संभ्रमाचे आहे. क्षीरसागर कुटुंबाबतील राजकीय मतभेद आणि त्यातून आता या कुटुंबातील तिघांनी विधानसभा निवडणुकीची सुरु केलेली तयारी, दुसरीकडे क्षीरसागर कुटुंबातील मतभेद हे क्षीरसागरांच्या राजकारणाला छेद देण्यासाठीची संधी म्हणून क्षीरसागर विरोधकांच्या एकीच्या सुरु असलेल्या चर्चा , यामुळे आज तरी बीड विधानसभा मतदारसंघात नेते असोत की कार्यकर्ते , यांच्या भूमिका संभ्रमाच्या आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघावर क्षीरसागर कुटुंबाने दीर्घकाळ वर्चस्व केलेले आहे. येथील मराठा राजकारणाला छेद देत या मतदारसंघाचे राजकारण ओबीसी, अल्पसंख्यांक करण्याचा पायंडा क्षीरसागर कुटुंबाने पाडला . क्षीरसागर कुटुंब व्यतिरिक्त सिराज देशमुख किंवा सय्यद सलीम यांच्यासारखे अल्पसंख्यांक आमदार देखील येथून झाले तर दुसरीकडे क्षीरसागरांना विरोधक करून सुरेश नवले , सुनील धांडे असे आमदार देखील या मतदारसंघाने दिले.
मागच्या विधानसभेतच क्षीरसागर कुटुंबात राजकीय मतभेद समोर आले आणि निवडणुकीच्या रिंगणात जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढत पाहायला मिळावी. त्यात जयदत्त क्षीरसागरांचा निसटता पराभव झाला. आता पाच वर्षानंतर क्षीरसागर कुटुंबातीलराजकीय मतभेद अधिकच वाढले आणि तिसरे क्षीरसागर म्हणू डॉ. योगेश क्षीरसागर जयदत्त क्षीरसागरांपासून वेगळे झाले. आजघडीला आ. संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर डॉ. योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे दावेदार आहेत. जयदत्त क्षीरसागर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत, मात्र त्यांचा पक्ष अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे आता विधानसभेच्या आखाड्यात तीन क्षीरसागर एकमेकांसमोर असणार का हा प्रश्न आहेच.
बीड मतदारसंघात क्षीरसागरांच्या एकत्रित वर्चस्वाला छेद देण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, काही प्रसंगात त्याला यश आले, मात्र बहुतांश वेळा विरोधक तोंडघशी पडले . आता क्षीरसागर कुटुंबात मतभेद झाल्यानंतर क्षीरसागर विरोधकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ओबीसी राजकारणाला छेद देण्यासाठी एकच मराठा चेहरा देता येतो का याची चाचपणी सुरु आहेच. शिंदे सेनेचे अनिल जगताप , अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बबन गवते, भाजपचे राजेंद्र मस्के यांच्यात एकत्र येण्याबाबत गुप्त खलबते सुरु आहेत. दुसरीकडे शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे , माजी राज्यमंत्री सुरेश नवले , शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले सीए बी. बी . जाधव , शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून घुसळण घातलेले भागवत तावरे या सर्वांचा समान अजेंडा क्षीरसागर विरोध हाच आहे.
यापलीकडे जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले आणि वेगळी सामाजिक समीकरणे जुळवू पाहणारे शेख तय्यब सध्या जनसंपर्क वाढवीत आहेत. , अजित पवारांच्याच राष्ट्रवादीत असलेले ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे जर राज्यपाल नियुक्तच्या यादीत 'कल्याण ' होणार नसेल तर कसेही विधानसभेच्या 'आखाड्या'त उतरण्याच्या मनस्थितीत आहेतच. त्यामुळे उमेदवार तरी किती असणार आणि कोणाकडून कोण असणार हा संभ्रम असणार आहेच. शिवाय जरांगेंची भूमिका काय असेल हे देखील महत्वाचे आहेच.

बातमी शेअर करा