लातूर दि.०३ (प्रतिनिधी)- ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. लातूरमध्ये ३९६ पैकी ३४६ फैऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त सहाशे बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. आता बसेसच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
लातूर विभागात पाच बस आगार आहेत. यात एकूण ५६४ बसच्या फेऱ्या होत असतात. दररोज किमान २ हजार ७५० च्या फेऱ्या होत असतात. संपूर्ण जिल्ह्यात दररोज ५० लाख रुपयांचा उलाढाल होत असते. मात्र सकाळच्या पहिल्या सत्रात अनेक बस निघाल्या होत्या. त्यानंतर संप सुरू झाला. ३९६ पैकी ३४६ फैऱ्या रद्द झाल्या आहेत. १९ हजार १९७ किमी अंतरावर बसेस धावल्याच नाहीत. संप किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता असल्यामुळे राष्ट्रपती दौऱ्यासाठी नियोजित बस सेवेचं काय होईल? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी ६०० बसचं नियोजन
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. याकरिता तब्बल ६०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बुद्ध विहार उद्घाटनानंतर उदगीर येथील उदयगिरी हायस्कूलच्या मैदानावर महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. याकरिता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला दाखल होणार असल्याने बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
संपामुळे लातूर प्रशासनाची धांदल
लातूर विभागातील १३० , नांदेडमधील २७०, परभणी येथील १५० तर यवतमाळ येथील ५० बसेस लातूर विभागात आज संध्याकाळी दाखल होणार आहे. त्या-त्या डेपोतून या बसेस मुक्कामी संबंधित गावात जाणार आहेत. उद्या सकाळी ७ वाजता गावातील महिलांना घेऊन सकाळी ९ पर्यंत त्या बसेस कार्यक्रम ठिकाणी येणार आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे.