Advertisement

वाचाळवीरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

पुणे-  मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याचे राजकारण चांगले तापले आहे. या मुद्द्यावरून नारायण राणे यांचे समर्थक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकारावर वाचाळ वीर वक्तव्य करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

 

बारामती दौऱ्यावरती असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "राज्यातील सरकार विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोश आणि राग आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असताना हे असंवेदनशील सरकार कोणतेही कारवाई करताना दिसत नाही". तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळल्यानंतर सरकारमधील वाचाळ वीर बोलत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. या वाचाळवीरांनी राज्याची माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

बदलापूर घटनेवरून विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "याबाबत आम्ही राजकारण करत नाही. राज्य सरकारने या प्रकारणावर योग्य वेळी ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असतं, तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती". देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यातील पोलिसावर गुन्हेगार कोयत्याने हल्ला करत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देणे आवश्यक आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Advertisement

Advertisement