मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राजकीय वातावरण तापला असून विरोधी पक्षाकडून सरकार वर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फूट उंच पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यात सोमवारच्या सकाळी अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त करण्यात आले होते. महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरत पुतळा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सोशल मीडिया वरती पोस्ट करत रोहित पवार म्हणाले, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० % वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ % वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा #गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून ५०,००० कोटीची दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली आहेत.
'एकीकडे कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडे तिजोरी खाली असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळ खोरीच्या मार्गावर येऊन ठेपलंय. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडं पाठ फिरवलीय'.
महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणं गरजेचं असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसेल अस रोहित पवार म्हणाले आहेत.