Advertisement

संपादकीय अग्रलेख - दर्जाची घसरण

प्रजापत्र | Tuesday, 27/08/2024
बातमी शेअर करा

राम मंदिराला काही काळातच लागलेली गळती असेल किंवा अटल टनेलचा विषय , अगदी गुरुग्राममधील घडलेली घटना , समृद्धी सारख्या महामार्गाला पडलेल्या भेगा , या साऱ्याच बाबी आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील कामे कशी होत आहेत, ते स्पष्ट करायला पुरेशा आहेत. उदघाटनाच्या घाणीतून असेल किंवा केवळ बिले काढण्यासाठी म्हणून , सार्वजनिक कामांच्या बाबतीत जो धसमुसळेपणा देशभर होत आहे, त्यातूनच मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतची दुर्घटना घडली आहे. केवळ कामांचाच नव्हे तर एकूणच राजकीय नीतिमत्तेचाच दर्जा घसरत चालला आहे.
 

 

मालवण  येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या ६ महिन्यातच कोसळला. खरेतर या पुतळ्याचे ज्यावेळी काम सुरु होते, त्याच वेळी याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह लावले जात होतेच. विशेष म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचे अनावरण केले, त्यावेळी दस्तुरखुद्द संभाजीराजे छत्रपतींनी या स्मारकाचे घाईघाईत अनावरण होत असल्याबद्दल तक्रार केली होती. अनावरणाबद्दलची जी घाई केली जात आहे, त्यामुळे दर्जाबद्दल तडजोड होत असल्याचा आरोप त्यावेळी खुद्द संभाजीराजेंनी केला होता. संभाजीराजेंचा पुन्हा पुन्हा उल्लेख यासाठी करायचा की तसे ते सरकारच्या जवळचे आहेत , पुन्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांपैकी आहेत , त्यामुळे त्यांना तरी गांभीर्याने घेतले जाणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. आणि अवघ्या ६ महिन्यात हा पुतळा कोसळला . असे स्मारक कोसळणे हा त्या महापुरुषांचा एकप्रकारे केलेला अवमानच आहे, आणि जेव्हा त्या स्मारकाचे अनावरण स्वतः पंतप्रधानांनी केलेले असते, त्यावेळी ते स्मारक ६ महिन्यातच जमीनदोस्त होणार असेल तर त्याचे अपश्रेय कोणाचे ?
बरे हे काही देशातले पहिलेवहिले किंवा एकमेव उदाहरण नाही. राम मंदिराच्या निर्मितीबाबतही असाच घाईच कार्यक्रम करण्यात आला. मंदिराचे काम पूर्ण झालेले नसताना , अर्धवट बांधकामामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा शास्त्रसंमत नसतानाही , ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचा  मुहूर्त साधायचा म्हणून घाईघाईने कार्यक्रम  उरकला गेला आणि पहिल्याच पावसात राम मंदिरात पाणी गळायला लागले. असेच काहीसे अटल टनेलच्या बाबतीत देखील घडलेले आहे. त्याही ठिकाणी आपण काहीतरी भव्यदिव्य करीत आहोत हे दाखविण्याच्या नादात लवकर उदघाटन उरकले गेले. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाचे देखील तेच. विशिष्ट कालावधीत हा महामार्ग पूर्ण करायचा आणि त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे म्हणून , ज्या पद्धतीने याचे काम उरकले गेले, त्यामुळे हा महामार्ग मोठ्याप्रमाणावर अपघातप्रवण झाला आहेच आता तर त्या महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत, खड्डे पडत आहेत. म्हणजे केवळ राजकीय श्रेया साठीची घाई केल्यास काय घडते याचीच ही सारी उदाहरणे आहेत. विकासकामे कालबद्ध पद्धतीनेच व्हायला हवीत , त्याचे सातत्याने पर्यवेक्षण देखील व्हायला हवेच, त्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही, मात्र हे करताना निव्वळ 'उरकण्याचा ' जो नवा राजकीय पायंडा सध्या , विशेषतः मागच्या एका दशकात पाडला जात आहे , तो घातक आहे.
एकीकडे राजकीय श्रेयासाठी लवकर कामे उरकण्याची घाई, तर दुसरीकडे कंत्राटदारांनी  सारी यंत्रणाच पोखरून खाल्ल्याचे चित्र आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल एक मंत्री म्हणून आदर असणारे अनेक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने देशभर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले आहे, ते काम लक्षणीय म्हणावे असे आहेच, मात्र या कामांच्या दर्जाचे काय ? नितीन गडकरी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे 'कामांचा दर्जा चांगला नसेल तर कंत्राटदारांवर कारवाई करू ' असे म्हणाले होते , पण देशभरातल्या अनेक राष्ट्रीय महामार्गांच्या दरजांवर आजही प्रश्नचिन्ह आहेच. बीड, धाराशिव, लातूर , जालना , छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधून जे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सिमेंटचे रस्ते चक्क दुभंगले आहेत. यांना खोर्ख्र राष्ट्रीय महामार्ग म्हणावे का असा प्रश्न अनेक ठिकाणी पडतो ? यातील किती कंत्राटदारांवर कारवाई झाली ? बाकी राज्य सरकारच्या अख्त्यारीतल्या कामांबद्दल तर फार काही बोलावे अशी परिस्थितीच नाही. पूर्वी स्थानी स्वराज्य संस्थांच्या यंत्रणेत जे घडायचे, ते आता राज्य सरकारच्या अख्त्यारीतल्या कामांच्या बाबतीत होत  आहे. इमारत पूर्ण झाली कि सहा महिन्यातच त्याला गळती लागते, छत पडायला होते, रस्ते आणि पुलांबद्दल फार काही बोलण्यासारखे नाही आणि नेहमीप्रमाणे कोणावरही कारवाई काहीच होत नाही . ही कारवाई न होण्यामागची करणे देखील तितकीच रंजक आहेत आणि राजकीय नेत्यांचा किती आणि कसा ऱ्हास झाला आहे,ते सांगणारी आहेत, त्यावर उद्याच्या अंकात. (पूर्वार्ध ) 

Advertisement

Advertisement