Advertisement

 मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला

प्रजापत्र | Monday, 26/08/2024
बातमी शेअर करा

बीड - मांजरा नदीला माेठा पूर आल्याने केज आणि कळंब तालुक्याच्या सीमेवरील फक्राबाद येथील बंधाऱ्याच्या दाेन्ही बाजूने रस्ता वाहून गेला. त्यामुळे रविवारी सकाळपासून बीड व धाराशिव जिल्ह्याची वाहतूक ठप्प झाली आहे.

 

तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पुरात मोठमोठी झाडे, झुडपे वाहून आल्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब व केज तालुक्याच्या सीमेवर आसलेल्या फक्राबाद येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दोन्हीही बाजूचा रस्ता खचला. त्यामुळे डोकेवाडी, गिरवली, जानकापूर, पारगाव, हिंगणी (बु.), हिंगणी (खुर्द), फक्राबाद, लाखनगाव, पारा, डोंगरेवाडी, सात्रा, खोंदला व भोपला असे एकूण १३ कोल्हापुरी बंधारे ओव्हरफ्लो झाले.  

 

 

मांजरा जलाशयात ३१.०८ टक्के पाणीसाठा
मांजरा जलाशयात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या नोंदीनुसार ३१.०८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मांजराचे विकास ठोंबरे यांनी माध्यमांशी  बोलताना दिली. रविवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान रस्ता वाहून गेल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या सीमेवरून होणारी वाहतूक व दळणवळण सकाळपासून ठप्प झाल्याची माहिती फक्राबादचे माजी सरपंच दिनकर मोराळे यांनी सांगितले. 

Advertisement

Advertisement