बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हल्ला प्रकरणात मागील दोन महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुंडलिक खांडे यांच्या जामिनावर गुरूवारी देखील निर्णय होऊ शकला नाही.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.शिवकुमार डिगे यांनी गुरूवारी सर्व बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला असून हे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले आहे. न्यायालय या प्रकरणात २८ तारखेला निर्णय देणार आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात दोन महिन्यापूर्वी तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली होती. सुरूवातीच्या पोलिस कोठडीनंतर सुमारे दीड महिन्याहून अधिक काळापासून कुंडलिक खांडे न्यायालयीन कोठडीत आहेत. बीडच्या सत्र न्यायालयाने खांडे यांची जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख्ंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणात न्या.शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मागील तारखेला न्यायालयाने सरकार पक्ष आणि याचिकाकर्त्याचे म्हणने ऐकले होते. त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारावर जामीन नाकारता येतो का? या विषयावरील युक्तीवादासाठी गुरूवार (दि.२२) ची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले दिले गेले. तर मुळ फिर्यादी ज्ञानेश्वर खांडे यांच्या वतीने आरोपीला जामीन मिळाल्यास ते फिर्यादीवर दबाव आणण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा तसे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जामीन देऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली. सर्व बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरचा निर्णय राखुन ठेवला असून तो बुधवार दि.२८ रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे आता आणखीन सहा दिवस तरी कुंडलिक खांडेंना कारागृहातच काढावे लागतील.