चकलांबा दि. २१ (वार्ताहर ) : चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून हे गाव चोरट्यांना आंदण दिले आहे का काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे . मंगळवारी चकलांबा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या असणाऱ्या पत्रकार सलमान शेख यांच्या घरावर दिवसा चोरट्यांनी हात साफ केला असून यामध्ये दिड तोळे सोने आणि ५० हजार रोक रक्कम लंपास केली आहे.
चकलांबा गावात पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पत्रकार सलमान शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सदस्य हिवरवाडी परिसरात आपल्या शेतात गेले होते तसेच या संधीचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी घराचे कूलुप तोडून घरातील दिड तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असे एकूण मिळून दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असला तरी चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
परिसरातील महिलांनी केली होती गस्तीची मागणी
चकलांबा गावात मागच्या काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट असल्याच्या चर्चा आहेत. गावातील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळेच या परिसरातील महिलांनी तीन दिवसांपूर्वीच सहायक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांची भेट घेऊन परिसरात गस्त सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे फारशा गांभीर्याने पहिले गेले नसल्याचा आरोप आता नागरिक करीत आहेत.