कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला थेट कोर्टात न आणता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, न्यायालय परिसरात प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करुन अक्षय शिंदे याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. आज त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, याप्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अक्षय शिंदे याची रवानगी 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.
प्रजापत्र | Wednesday, 21/08/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा