मुंबई- बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली असताना बदलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून बदलापूरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्जचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे, त्याच वेळी बदलापूरमध्ये शाळेच्या ठिकाणी जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत काय काय झाले आहे? हे जाणून घेऊयात.
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या २ मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.लघुशंकेसाठी जाताना शाळेच्याच शिपायाकडून या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार.१२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.या मुली शाळेत जायला तयार नसल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली.परंतु गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
लघुशंकेसाठी मुली एकट्या कशा पाठवल्या?, सेविका असताना त्या सोबत का गेल्या नाहीत? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जातोय. तर बदलापूर बंदनंतर मात्र लोकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशा प्रकारची मागणी करत मोठ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर विविध राजकीय नेते आता त्यांच्या भूमिका मांडताना दिसत आहेत.