कोंबड्या ठेवायच्या एका डालग्यात तुऱ्यावाले कोंबडे किती ठेवायचे याचे शहाणपण ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला असते. एकाच डालग्यात तुऱ्यावाल्या कोंबड्यांची संख्या जास्त झाली तर ते एकमेकांनाच चोची मारणार हे उघड आहे. सध्या महायुतीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. भाजप काय किंवा शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, सारेच राजकारणातले तुर्रेबाज, आता मात्र एकत्र राहायची अपरिहार्यता, त्यामुळेच आता महायुतीची अवस्था 'तुझे माझे जमेना' अशी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या ताफ्याला पुण्यात काळे झेंडे दाखविले गेले. मुळात पुणे म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी काळे झेंडे पाहायला मिळणे अजित पवारांची राजकीय दृष्ट्या तसे नाचक्कीचेच, आणि त्यातही हे काळे झेंडे दाखविणारे हात भाजपचे असावेत, याला काय म्हणावे? 'हेचि फळ काय मम पक्षांतराला?' असा प्रश्न अजित पवारांनी स्वतःलाच अनेक वेळा विचारला असेल. तसे असा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ काही अजित पवारांवर मागच्या काही काळात पहिल्यांदा आली आहे असेही नाही. भाजपची दादागिरी 'दादांवर' भारी पडतेय हेच चित्र राज्यात आहे. आता तर त्यांना 'सुनेत्रा वहिनींना सुप्रिया सुळेंसमोर निवडणुकीला उभे करून चूकच झाली' याची देखील उपरती झाली आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा मूळ मतदार सोबत यायला तयार नाही, ज्या भाजपसाठी हा अट्टाहास केला, त्या भाजपचा कार्यकर्ता अजित पवारांना स्वीकारायला तयार नाही, आणि त्यात कहर म्हणजे आता भाजपवालेच चक्क काळेझेंडे दाखविणार, हे म्हणजे अजित पवारांच्या दृष्टीने जरा अतिच झाले. बरे इतक्यावर हे प्रकरण थांबत नाही, एकीकडे राष्ट्रवादीचे, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष 'असले झेंडे दाखविणारांना तंबी देण्याची' मागणी करतात, त्याच पक्षाचे अमोल मिटकरींसारखे वाचाळवीर भाजपवर गुरगुरण्याचा प्रयत्न करतात, तरीही भाजपवाले त्याची दखल घेणे तर दूर , भाजपचे नेते चक्क असली विधाने धुडकावून लावतात याला काय म्हणावे?
हे झाले भाजप आणि राष्ट्रवादीच्या संबंधांचे, राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे आहे, त्या शिवसेनेचे आणि भाजचे संबंध देखील काही फारसे 'सुमधुर ' म्हणावेत असे दिसत तरी नाहीत. शिंदे सेनेचे एकेक नेते रोज काही तरी बोलत असतात. आपल्याकडे कमी आमदार असले म्हणून काय झाले, मुख्यमंत्री आपला आहे ही भावना त्यामागे आहेच. त्यामुळे राज्यात आपण काहीही बोलू शकतो अशी या नेत्यांची खात्री. बरे लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे पानिपत भाजपच्या तुलनेत काहीसे कमी झाले, म्हणजे किमान लाज राखली गेली असे म्हणण्यासारखी परिस्थिती, त्यामुळे देखील आता राज्यात आपली 'पत ' वाढल्याचा साक्षात्कार शिंदे सेनेला झालेला आहे. त्यामुळे ते भाजपवर देखील टीका करायला मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. रामदास कदम यांनी थेट 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा. तसेच ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत', असे विधान केले.त्यांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, आमचंही मनं दुखावलं जातं. मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौन पाळून आहेत . मुळात शिंदेंचे मुख्यमंत्री होणे आणि त्या सरकार मध्ये स्वतःला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणे हे ना देवेंद्र फडणवीसांना पचलेले आहे, ना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना, त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना यांच्यातही 'मिले सूर मेरा तुम्हारा' चे चित्र निर्माण व्हायला तयार नाही. अशीच परिस्थिती अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची. शिवसेना सोडताना आणि पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतानाही आताच्या शिंदे सेनेचे नेते कुरकूर करायचे ते अजित पवारांच्याच नावाने, आता पुन्हा त्याच अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या, आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते शिंदे सेनेच्या नेत्यांची कसलीच पत्रास ठेवायला देखील तयार नाहीत, त्यामुळे मग त्यांच्यातूनही आडवा विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही म्हणायला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याला दाखवायला का होईना 'सलामत रहे दोस्ताना हमारा' दाखवित असतात, पण संघटनात्मक पातळीवर महायुती बऱ्यापैकी दुभंगलेली आहे. भाजप शिवसेनेची युती जशी पूर्वी नैसर्गिक युती मानली जायची, तसे आता महायुतीमध्ये राहिलेले नाही. महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी एकमेकांना मित्र मानणारे तर दूर पाण्यात पाहत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात घराघरामध्ये पूर्वी कुक्कुटपालन केले जायचे. त्यातील कोंबड्या झाकण्यासाठी म्हणा किंवा ठेण्यासाठी म्हणा मोठे डालगे वापरले जायचे. मात्र हे करताना एका डालग्यात तुऱ्यावाले कोंबडे किती ठेवायचे असतात याचे व्यवहार ज्ञान त्या शेतकऱ्याला असायचे. एकाच डालग्यात चार पाच तुऱ्यावाले कोंबडे आले तर ते एक दुसऱ्याला चोची मारणारच, त्यातून जखमी होणार ते कोंबडेच. पण जे व्यवहार ज्ञान ग्रामीण भागातील कोंबड्या पाळणाऱ्या शेतकऱ्याला होते, ते महाराष्ट्राच्या राजकारणाला कोंबड्यांच्या झुंजीचे स्वरूप दिलेल्या आणि झुंज लावून तमाशा पाहणाऱ्या दिल्लीस्थित 'महाशक्ती'ला नाही असेच चित्र आहे. महायुतीमधील धुसफूस हेच सांगणारी आहे.