मुंबई- आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यावरून महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीका करत आहेत. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर सूचक शब्दांत भाष्य केले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा जास्त लाभ घेऊन त्याद्वारे अधिक मते मिळवण्याचा सरकारचा हेतू दिसत आहे, याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. यावर, चार राज्यांच्या निवडणुका आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचा विषय चार राज्यांचा नाही. हा विषय फक्त महाराष्ट्राचा आहे. सरकारकडून छोट्या योजना राबवले जात आहेत त्यासाठी तरतूद नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यासंबंधी भूमिका मांडतील, असे शरद पवार म्हणाले.
‘लाडकी बहीण’मुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार का?
‘लाडकी बहीण’मुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकण्यात आल्यात का, याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार म्हणाले की, मला काही माहिती नाही. हा निवडणूक आयोगाला विचारण्याचा प्रश्न आहे. आम्ही त्यात काय सांगणार. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना मांडली होती. सगळ्या निवडणुका एकत्र घेऊन त्याचा फायदा व्हावा, हा उद्देश त्यामागे होता आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या. याचा अर्थ यांना फारसे महत्त्व द्यायचे कारण नाही. पंतप्रधान बोलतात एक आणि यंत्रणा दुसराच निर्णय घेते, याची प्रचिती आपल्याला आली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बारामतीतून अनेकदा लढलो, आता तिथून निवडणूक लढवण्यात रस राहिलेला नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. यावर बोलताना, ना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथून ते लढतील. त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहिती नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.