सातारा : राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीजबिल देखील शून्य होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
पाटण (जि.सातारा) तालुक्यातील मान्याची वाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याची वाडीचे लोकार्पण करताना शिंदे बोलत होते. वीज क्षेत्रात राज्य सरकारने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाला फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याची वाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक(प्रकल्प)प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे.
१०० गावांत १०० टक्के सौरऊर्जा
फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे १२ हजार मेगावॉट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. राज्याने सौर ऊर्जेमध्ये आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मान्याची वाडीचे लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी ५ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु झाली आहे.