Advertisement

देशातील वैद्यकीय सेवा २४ तासांसाठी राहणार बंद

प्रजापत्र | Friday, 16/08/2024
बातमी शेअर करा

कऱ्हाड : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीवर कर्तव्यावर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा वगळता नियमित बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) पहाटे सहा ते रविवारी (ता. १८) पहाटे सहा वाजेपर्यंतच्या २४ तासासाठी बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल देसाई यांनी दिली आहे.

डॉ. देसाई म्हणाले, याप्रकरणी निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता. प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले.

आरजी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाल्याने १३ ऑगस्टला कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. कालच आरजी कार मेडिकल कॉलेजची मोठ्या जमावाने तोडफोड केली. आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो. या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा वगळता नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) पहाटे सहा ते रविवारी (ता. १८) पहाटे सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील.

इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करत आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करत आहोत, तरी इंडियन मेडिकल असोसिएशनला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोशिएशनच्या सचिव डॉ. अनघा राजगुरू, खजिनदार डॉ. जयवंत पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement