Advertisement

धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्रालयात ३०० कोटींचा घोटाळा?

प्रजापत्र | Wednesday, 14/08/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१४ (प्रतिनिधी)-राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रालयात तब्बल 300 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप तुषार पडगीलकर यांनी केला आहे.कृषी सचिव व्ही.राधा यांनी घोटाळ्यावर आक्षेप घेतल्याने त्यांची बदली करण्यात आल्याच्या चर्चा आहेत.लागोपाठ तीन अधिकाऱ्यांच्या कृषी खात्यातून बदल्या करण्यात आल्या आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे आता राज्यात याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 
       देशभरात सातत्याने सुरु असणारे नवनवीन घोटाळे आता सामान्यांसाठी तसे नवीन राहिले नाहीत.त्यातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे समजले जाणाऱ्या कृषी मंत्रायलयात आता असाच एक मोठा घोटाळा चर्चेत येत आहे.सरकारने शेतकरी हितासाठी डीबीटी धोरण आणले होते.या धोरणामुळे शेतकऱ्यांना खते,बी-बियाणे न पुरवता त्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येणार होते.मात्र कृषी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या मर्जीनुसार चालण्यासाठी मूळ धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे नव्या जीआरनुसार डीबीटीला टाळून तातडीने बी-बियाणे,कृषी औजारे पुरविण्याचे आदेश या नव्या धोरणानुसार काढण्यात आले.या आदेशाला उपसचिवांनी मंजूर दिली होती.त्यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदानाचे मिळणारे पैसे पुन्हा ठेकेदार आणि इतरांकडे वळविण्यात आल्यामुळे यात आता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. यावर थेट कृषी सचिव व्ही.राधा यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आल्याच्याही चर्चा सध्या सुरु आहेत. दरम्यान डीबीटी वगळून कृषी उद्योग महामंडळाला स्पेयर वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली.चार निविष्ठांसाठी पैसे ही दिले गेले असून कृषी पंपासाठी ८१ कोटी,नॅनो युरिया आणि डीएपीसाठी १५० कोटी तर मेटल डीहाईड पेस्टीसाईडसाठी २५ कोटी तसेच यंत्रमाग महामंडळाला कापूस साठवणूक बॅगसाठी ७९ कोटी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.दरम्यान कृषी खात्यात सुरु असलेल्या या आरोपींमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Advertisement

Advertisement